World Cup 2023 Points Table : अफगाणिस्तानच्या विजयाने पाकिस्तानला 'जोर का झटका', सेमीफायनलचं गणितच बिघडलं!

Pakistan Cricket team : नेदरलँड्सविरुद्धच्या विजयासह (AFG vs NED) अफगाणिस्तानने पाकिस्तानला खाली खेचत पाईंट्स टेबलमध्ये (World Cup 2023 Points Table) 5 व्या स्थानी झेप घेतली आहे. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे आता बाबर आझमला मोठं टेन्शन आलंय.

सौरभ तळेकर | Updated: Nov 3, 2023, 08:56 PM IST
World Cup 2023 Points Table : अफगाणिस्तानच्या विजयाने पाकिस्तानला 'जोर का झटका', सेमीफायनलचं गणितच बिघडलं! title=
Pakistan World Cup 2023 Semi final qualification Scenario

Pakistan Semi final Scenario : अफगाणिस्तानने वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सचा (AFG vs NED) पराभव करून सेमीफायनल गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 34व्या सामन्यात अफगाणिस्तानच्या पठ्ठ्यांनी नेदरलँड्सचा 7 विकेट्सने पराभव करत वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) चौथा विजय नोंदवला आहे. या विजयासह अफगाणिस्तानने पाकिस्तानला खाली खेचत पाईंट्स टेबलमध्ये (World Cup 2023 Points Table) 5 व्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळत आहे. बांग्लादेशच्या विजयाने आता पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. 

अफगाणिस्तानचा दमदार विजय

नेदरलँडने दिलेल्या 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाने 31.3 षटकांत 3 गडी गमावून 181 धावा केल्या. नेदरलँडचा संघ 46.3 षटकांत 179 धावांत गारद झाला होता. सायब्रॅंड एंजेलब्रेक्ट याने एकाकी झुंज दिली होती. अफगाणिस्तानसाठी रहमत शाहने 54 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या तर कर्णधार हशमतुल्ला शाहिदी 56 धावा करून नाबाद माघारी परतला. 

अफगाणिस्तानच्या आशा जिवंत

अफगाणिस्तानने मागील 7 सामन्यात रोमांचकरित्या 4 सामन्यात विजय मिळवला आहे. एकेकाळी अंडररेटेड राहिलेला हा संघ आता सेमीफायनल गाठू शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे. सध्या अफगाणिस्तानच्या खात्यात 8 गुण आहेत. तर दुसरीकडे अफगाणिस्तानचे दोन सामने बाकी आहेत. या दोन्ही सामन्यात अफगाणिस्तानचा विजय झाला तर अफगाणिस्तान वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदा सेमीफायनल गाठू शकतो. मात्र, अफगाणिस्तानसाठी इथून पुढचा टप्पा सर्वात अवघड असणार आहे. अफगाणिस्तानचा आगामी सामना ऑस्ट्रेलियाशी येत्या 7 नोव्हेंबरला कोलकातामध्ये होणार आहे. तर त्यानंतर अफगाणिस्तान तगड्या फॉर्ममध्ये असणाऱ्या साऊथ अफ्रिकेशी भिडणार आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडची गणित सोप्पं झालंय.

पाकिस्तानचा जोर का झटका

अफगाणिस्तानच्या या विजयामुळे आता सर्वात मोठं टेन्शन आलंय ते बाबर आझमला... अफगाणिस्तानने पाचवं स्थान मिळवल्यानंतर आता पाकिस्तान पाईंट्स टेबलमध्ये एक स्थानाने घसरला आहे. पाकिस्तान आता सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. पाकिस्तानचे देखील 2 सामने बाकी आहेत. पाकिस्तान येत्या 4 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी खेळणार आहे. तर 11 तारखेला इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामना वर्ल्ड कपमधील निर्णायक सामना असणार आहे.