WTC Final : ऑस्ट्रेलियाला धक्का! भारत विरूद्ध श्रीलंकेमध्ये होणार सामना? पाहा कसं आहे समीकरण?

ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर गेली तर भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये हा सामना खेळवला जाईल. हे समीकरण नेमकं कसं आहे, जाणून घेऊया.

Updated: Feb 22, 2023, 04:02 PM IST
WTC Final : ऑस्ट्रेलियाला धक्का! भारत विरूद्ध श्रीलंकेमध्ये होणार सामना? पाहा कसं आहे समीकरण? title=

ICC World Test Championship Points Table : आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (World Test Championship) ची शर्यत दिवसेंदिवस अधिक रोमांचक होताना दिसतेय. सध्या पॉईंट्स टेबलच्या (Points Table) अग्रस्थानी ऑस्ट्रेलियाची टीम असून कांगारू ही फायनल खेळण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जातायत. मात्र दुसरीकडे यामध्ये बदल होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येतेय. अजून कोणीही या स्पर्धेच्या फायनल सामन्यासाठी क्वालीफाय केलेलं नाही. यामध्ये एक असा बदल घडू शकतो, ज्यामुळे सध्या नंबर 1 असलेली टीम फायनलच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकते.

ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर गेली तर भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये हा सामना खेळवला जाईल. हे समीकरण नेमकं कसं आहे, जाणून घेऊया.

ICC WTC 2023 पॉईंट्स टेबलची ताजी आकडेवारी

सध्या पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम 66.67 टक्केवारीनुसार, पहिल्या नंबरवर आहे. सध्या या आकड्यांमध्ये घट झाली आहे कारण, ऑस्ट्रेलियाची टीम भारताविरूद्ध 2 टेस्ट सामने हरली. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर टीम इंडिया आहे असून त्यांचे पॉईंट्स 64.06 आहे. तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेची टीम असून 53.33 टक्के त्यांची आकडेवारी आहे. या तिन्ही टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी दावेदार आहेत. 

टीम इंडिया जर इंदूरमघ्ये होणारा सामना जिंकली तर पॉईंट्स टेबलमध्ये आपण पहिल्या क्रमांकावर पोहोचू, याशिवाय ऑस्ट्रेलिया टीमचं इथे खूप मोठं नुकसान होणार आहे. अशा परिस्थितीत जर चौथा सामना पण ऑस्ट्रेलिया हरली तर पूर्ण गणित फिस्कटण्याची शक्यता आहे. 

ऑस्ट्रेलिया पुढील दोन्ही सामने हरली तर...

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे अजून 2 सामने बाकी आहे. ऑस्ट्रेलिया भारताविरूद्धचे हे दोन्ही सामने हरली तर पॉईंट्स टेबलमध्ये कांगारूंची टीम 2 क्रमांकावर येईल. दुसरीकडे श्रीलंकेची टीम न्यूझीलंडविरूद्ध 2 टेस्ट सामन्यांची सिरीज खेळणार आहे. श्रीलंकेची टक्केवारी सध्या 53.33 आहे आणि जर श्रीलंकेने दोन्ही सामन्यात न्यूझीलंडला मात दिली तर त्यांची टक्केवारीमध्ये वाढ होणार आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाची टीम तिसऱ्या क्रमांकावर येईल आणि भारतानंतर श्रीलंकेची टीम दुसऱ्या क्रमांकावर येईल. त्यामुळे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवला जाईल.

जर ऑस्ट्रेलियाची टीम दोन्ही सामने हरली तर त्याची टक्केवारी 66.67 वरून 59.65 वर घसरेल. दुसरीकडे, श्रीलंकेची टीम दोन सामने जिंकली आणि टक्केवारी 61.11 होईल. पण ऑस्ट्रेलियाच्या टीमने एकही सामना ड्रॉ केला तर श्रीलंकेच्या विजयाचा किंवा पराभवाचा कोणताही परिणाम होणार नाही.