Babar Azam: इंग्लंडविरूद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तान टीमचं वनडे वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. इंग्लंड विरूद्ध पाकिस्तान या सामन्यानंतर सेमीफायनलचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. या सामन्यात इंग्लंडच्या टीमने 93 रन्सने पाकिस्तानचा पराभव केला. अशाप्रकारे शेवटच्या सामन्यातही पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टीमकडून काही चुका झाल्याचं मान्य केलंय.
पाकिस्तानला शेवटच्या सामन्यात इंग्लंडकडून 93 रन्सने पराभव पत्करावा लागला. यानंतर कर्णधार बाबर आझमने पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये टीमकडून नेमक्या कोणत्या चुका झाल्या याबाबत माहिती दिली आहे.
बाबर आझमने सांगितलंय की, टीमच्या कामगिरीने मी खूप निराश झालोय. मुळात जर आम्ही दक्षिण आफ्रिकेचा सामना जिंकला असता तर चित्र कदाचित वेगळं असतं. पण होय, गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डींगमध्ये आमच्याकडून अनेक चुका झाल्या आहेत. आम्ही 20-30 अतिरिक्त रन्स दिले.
बाबर पुढे म्हणाला की, आमच्या स्पिनर्सनेही विकेट घेतलेल्या नाहीत. याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं. मधल्या ओव्हर्समध्ये स्पिनर्स विकेट घेत नसतील तर संघर्ष करावा लागतो. दरम्यान यावर आम्ही एकत्र बसून चर्चा करणार आहोत. आम्ही या स्पर्धेतून सकारात्मक गोष्टी घेऊ.
पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी इंग्लंडने 50 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 337 रन्स केले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 84, जो रूटने 60 आणि जॉनी बेअरस्टोने 59 रन्सचं योगदान दिलं. तर डेव्हिड मलानने 31, हॅरी ब्रूकने 30 आणि जोस बटलरने 27 रन्स केले. पाकिस्तानकडून हरिस रौफने 3 विकेट्स तर शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांना प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळाल्या.
338 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची टीम अवघ्या 244 रन्सवर आटोपली. पाककडून आघा सलमानने सर्वाधिक ५१ रन्स केले. कर्णधार बाबरने 38 तर रिझवानने 36 रन्स केले. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने तीन विकेट्स तर आदिल रशीद, गुस ऍटकिन्सन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेत इंग्लंडला विजय मिळवून दिला.