हार्ले डेव्हिडसन भारतातील मॉडेल बंद करण्याच्या तयारीत

हार्ले डेव्हिडसन बाईकची तरुणांमध्ये मोठी क्रेझ

Updated: Sep 25, 2020, 09:18 AM IST
हार्ले डेव्हिडसन भारतातील मॉडेल बंद करण्याच्या तयारीत
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : अमेरिकन कंपनी हार्ले डेव्हिडसनने, भारतातील व्यवसाय मॉडेल बंद करण्याची गुरुवारी घोषणा केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत हरियाणा बावळ येथील आपल्यी मॅन्युफॅक्चरिंग केंद्र बंद करण्याची आणि गुडगावमध्ये असणाऱ्या विक्री कार्यालयात मोठी घट करण्याची कंपनीची योजना असल्याचं या दुचाकी उत्पादकाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

हार्ले डेव्हिडसन बाईकची तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे. अनेकदा ऑफरोडिंगसाठी या बाईक्सना पसंती असते. त्यामुळे हार्ले डेव्हिडसन बाईक प्रेमींसाठी ही वाईट बातमी ठरु शकते. हार्ले डेव्हिडसनकडून सांगण्यात आलं की, कंपनीच्या डीलर नेटवर्क कॉन्ट्रॅक्ट कालावधीद्वारे ग्राहकांसाठी सेवा सुरु राहणार आहे. तसंच कंपनी आपलं व्यवसाय मॉडेल बदलत आहे आणि आपल्या ग्राहकांना सेवा देत राहण्याच्या पर्यायांचं मूल्यांकन करत आहे.

देशातील आपला व्यवसाय चालवण्यासाठी भागीदाराशी करार करण्याच्या विचारात असल्याची माहिती उद्योग सुत्रांनी दिली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे जवळपास 70 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 23 सप्टेंबर 2020 ते पुढील 12 महिन्यांमध्ये पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.