आता, स्वस्त 'आयफोन'चं तुमचंही स्वप्न पूर्ण होणार...

मीडिया रिपोर्टसनुसार, ऍप्पलनं आपल्या या स्वस्त फोनच्या प्रोडक्शनची सगळी तयारी पूर्ण केलीय

Updated: Jan 30, 2020, 06:20 PM IST
आता, स्वस्त 'आयफोन'चं तुमचंही स्वप्न पूर्ण होणार...

मुंबई : इतरांच्या हातात 'आयफोन' पाहिल्यानंतर हा फोन आपल्याकडेही असावा, असं नकळत कधीतरी तुम्हालाही वाटलं असावं... परंतु, एवढ्या महागड्या फोनची आपल्याला गरज नाही असं म्हणत कदाचित तुम्हीही आयफोनचा विचार कानामागे टाकला असेल. परंतु आता तुमच्या खिशाला सहज परवडणारा आयफोन बाजारात येतोय. जगातील सर्वात महागडे फोन निर्माण करणारी कंपनी ऍप्पल (Apple) आता एक स्वस्त आयफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या नव्या फोनचं उत्पादन नव्या महिन्यात अर्थात फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचं सांगण्यात येतंय. या नव्या आयफोनची किंमत भारतात विकल्या जाणाऱ्या चीनी मोबाईल हॅन्डसेटपेक्षाही कमी असेल. 

मीडिया रिपोर्टसनुसार, ऍप्पलनं आपल्या या स्वस्त फोनच्या प्रोडक्शनची सगळी तयारी पूर्ण केलीय. नव्या फोनमध्ये ४.७ इंचाचा एलईडी (LED) डिस्प्ले असेल. यासोबतच टच आयडी होम बटनही असेल. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या नव्या हॅन्डसेटमध्ये ए १३ चीप आणि ३ जीबी रॅमही असेल. 

या नव्या हॅन्डसेटला 'आयफोन ९' असं नाव दिलं जाऊ शकतं. याचं कारण म्हणजे, 'आयफोन ८' नंतर सीरीजमध्ये 'आयफोन १०' आणि 'आयफोन ११' लॉन्च झाले... मात्र, 'आयफोन ९' मागे राहिला.

ऍप्पलचे हॅन्डसेट अनेकदा अनेकांच्या खिशाला न पेलणारेच राहिलेत. अशावेळी अनेक युझर्सनं ऍप्पलचे फोन घेण्यात असमर्थता दर्शविली. त्यामुळेच की काय आता सर्व स्तरांतील ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी ऍप्पल कंपनीनं हे पाऊल उचललेलं दिसतंय. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नवा आयफोन किंमतीत सद्य फोनपेक्षा तीन पटीनं स्वस्त असू शकतो. भारतात ऍप्पलच्या नव्या फोनची किंमत ३० हजार रुपयांहून कमी असू शकते. 

'आयफोन'ला सर्वात जास्त नुकसान भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये होतोय. अत्यंत महागडे फोन निर्माण केल्यानं संपूर्ण जगभरात अत्यंत कमी हॅन्डसेटची विक्री होते. अशावेळी चिनी कंपन्यांच्या फोन मात्र विक्रीचा उच्चांकी आकडा गाठण्यात यशस्वी ठरतात. 

किंमत थोडी कमी करून मार्केटवर ताबा मिळवता येऊ शकतो, असं ऍप्पल कंपनीच्या प्रशासनाला आता वाटतंय. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलाय.