बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीने (Manoj Bajpayee) नवी दिल्ली येथे अभिनय प्रशिक्षक बॅरी जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यासंबंधी खुलासा केला आहे. यावेळी शाहरुख खान (Shahrukh Khan) मनोज बाजपेयीचा वर्गमित्र होता. पण आपण कधीही एकत्र कुठे फिरलो नाही. याचं कारण शाहरुख खानचं जग वेगळं होतं. तसंच त्याच्या इच्छाही आपल्यापेक्षा वेगळ्या होत्या असं मनोज बाजपेयीने म्हटलं आहे. मनोज बाजपेयीने सांगितलं की, आपल्याला कधीही फॉलोअर्सने घेरलेलं असावं असं वाटलं नाही, तस शाहरुखने यशाची जी उंची गाठली आहे ते पाहून नाराज असल्याचा दावाही फेटाळून लावला.
बरखा दत्त यांना मोजो स्टोरीवर दिलेल्या मुलाखतीत मनोज बाजपेयीला विचारण्यात आलं की, शाहरुख खान आणि तू एकत्र सुरुवात केली असताना त्याला मिळालेलं यश पाहून तुला कटू वाटतं का? त्यावर त्याने उत्तर दिलं की, "शाहरुखला नेहमीच आपल्यावर सर्वांनी प्रेम करावं, आपण स्टार व्हावं, सर्वांच्या केंद्रस्थानी असावं असं वाटत होतं. पण माझं ते टार्गेट नव्हतं. माझ्या अवतीभोवती थिएटरमधील 20 लोकांनी गर्दी केली नसेल तरी मला त्याचं काहीच वाटत नव्हतं. कोणीही माझ्याकडे पाहत नसलं तरी मला त्याचं काहीच वावगं नव्हतं. मला एका बाजूला कोपऱ्यात राहण्यात काहीच समस्या नव्हती".
याचा परिणाम तुझ्या आत्मविश्वासावर झाला का? असं विचारलं असता तो म्हणाला, "अपयशामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो. एखादा व्यक्ती तुमच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध आहे याच्यामुळे नाही". मनोजने बॅरी जॉनला आपल्याला सक्षम बनवण्याचं श्रेय दिलं. आपल्याला चांगलं इंग्रजी येत नसतानाही त्याने कधीच मत तयार केलं नाही याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. “अनेकदा, तो मला आव्हान द्यायचा, जेव्हा तो दिव्या (सेठ) किंवा ऋतुराज (सिंग) किंवा शाहरुखसोबत इंग्रजी नाटक करत असे, तेव्हा तो मला छोटी भूमिका द्यायचा".
तो आणि शाहरुख समकालीन आहेत का? असं विचारले असता मनोज म्हणाला, “आम्ही एकमेकांना ओळखत होतो, पण आमचे मित्र मंडळी सारखे नव्हते. आम्ही दोन वेगळ्या जगातून येतो हे लोकांना समजून घ्यावं लागेल. लोक विचारतात की तुम्ही का भेटत नाही आणि मी त्यांना सांगतो, ‘आपण भेटू शकत नाही’. तेव्हाही ते एका ‘खास जगा’चा होता. केवळ जामियामध्ये शिक्षण घेतल्याने ते नियमित व्यक्ती बनत नाहीत. मला प्रत्येक वेळी 10 लोकांनी वेढले नव्हते. शाहरुख नेहमीच एक मोहक व्यक्ती होता, तो नेहमीच लोकांच्या भोवती असायचा".
शाहरुख तीन दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीच्या शिखरावर राहिला आहे, तर मनोजनेही चांगलं यश मिळवले आहे. त्याने राम गोपाल वर्माच्या सत्या मधील भूमिकेतून सुरुवात केली आणि त्यानंतर द फॅमिली मॅनमुळे स्ट्रीमिंग स्टारडम मिळवले. तो आता कानू बहलच्या डिस्पॅचमध्ये दिसणार आहे.