'ऍलेक्सा'चा आवाज होणार बी- टाऊनचा 'हा' लोकप्रिय अभिनेता

'ऍलेक्सा हे कर...', 'ते कर....' 

Updated: Sep 16, 2020, 10:49 AM IST
'ऍलेक्सा'चा आवाज होणार बी- टाऊनचा 'हा' लोकप्रिय अभिनेता  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : 'ऍलेक्सा हे कर...', 'ते कर....' किंवा मग एखादा प्रश्न पडला तरीही ऍलेक्साला प्रश्न विचाराणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. ऍलेक्साचा आवाज जणू अनेकांच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य भाग झाला आहे. याच ऍलेक्साच्या आवाजाच्या निमित्तानं एक अतिशय लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सर्वांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटांमधून या अभिनेत्याचा भारदस्त आवाज आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. किंबहुना कलाविश्वात या अभिनेत्याची एक वेगळी ओळख आहे. 

आता ऍलेक्सासाठी आवाज देणारा हा अभिनेता नेमका कोण, असाच प्रश्न तुम्हालाही पडत आहे ना? तर, हा आवाज आहे महानायक अमिताभ बच्चन यांचा. ऍमेझॉनच्या नव्या स्किमसाठी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत पार्टनरशिप करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत Amezon च्या व्हॉईस असिस्टंट सर्व्हिस असणाऱ्या ऍलेक्सासाठी पहिल्यांदाच कोणी भारतीय सेलिब्रिटी आवाज देणार आहे. 'बच्चन ऍलेक्सा' अशी त्याची नवी ओळख असणार आहे. 

नव्या संकल्पनेच्या माध्यमातून अमिताभ बच्चन युजर्सना विनोद, हवामान वृत्त, शेर- शायरी, कविता ऐकवतील. २०२१ पासून ही संकल्पना अंमलात आणली जाणार आहे. ज्यासाठी युजर्सकडून काही शुल्क आकारण्यात येणार आहे. 'बच्चन ऍलेक्सा'शी बोलण्यासाठी तुम्ही फक्त  'Alexa, say hello to Mr. Amitabh Bachchan' असं म्हणणं अपेक्षित असेल. 

 

ऍलेक्सासोबतच्या या पार्टनरशिपबाबत सांगताना अमिताभ बच्चन म्हणाले, 'नव्या तंत्रज्ञानानं मला कायमच नव्या गोष्टींशी जोडण्याची संधी दिली आहे. मग तो एखादा चित्रपट असो, टीव्ही शो असो, पॉडकास्ट किंवा आणखी काही असो. मी या सुविधेसाठी आवाज देण्यास फारच उत्सुक आहे. व्हॉईस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मी नव्यानं आणि मोठ्या प्रमाणात चाहत्यांशी जोडला जाईन'.