बायबाय...! मारुती ओमनीची निर्मिती बंद करण्याचा कंपनीचा निर्णय

मारुती ओमनी ८०० हे मॉडेल ३५ वर्षांपूर्वी, म्हणजेच १९८४ साली दाखल झाले होते.

Updated: Apr 5, 2019, 06:10 PM IST
बायबाय...! मारुती ओमनीची निर्मिती बंद करण्याचा कंपनीचा निर्णय title=

मुंबई : ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीपैकी एक असलेल्या मारुती कंपनीने ओमनी गाडीचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मारुती सुझूकीच्या ओमनीचे हे मॉडेल तब्बल ३५ वर्षांपूर्वी सुरु बाजारात आणले होते. ओमनी गाडीची लोकांमध्ये एकावेळेस वेगळीच क्रेझ होती. ड्रायव्हरच्या मागील बाजूस असलेल्या समोरासमोरील आसनव्यवस्थेमुळे ही गाडी घेण्यासाठी अनेकांनी पंसती दर्शवली होती. या ओमनीच्या गाडीसोबतच एका पिढीच्या अनेक आठवणी आहेत. 

ओमनीच्या गाड्यांचा सध्या मुंबईत खासगी वाहतुकीसाठी तसेच स्कूल व्हॅन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तसेच ९० च्या दशकातील सिनेमांमध्ये या गाडीचा अपहरणाचं दृश्य दाखवण्यासाठी वापर आपल्याला आठवत असेल. त्यामुळे किडनॅपिंगची गाडी अशी स्वतंत्र ओळख ओमनीला मिळाली होती.

ओमनीचा इतिहास

मारुती ओमनी ८०० हे मॉडेल ३५ वर्षांपूर्वी, म्हणजेच १९८४ साली दाखल झाले होते. ओमनीच्या मॉडेलमध्ये जरी ३५ वर्षांपासून बदल झाले नसले तरी, काळानुसार रस्ते वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत. या बदललेल्या नियमांमुळे हे मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

मारुतीचे ओमनी हे मॉडेल सेवेन्थ जनरेशन सुझुकी सुपर कॅरीनुसार कार्य करते. परंतू यामध्ये काही नियमांनुसार बदल केले गेले नाहीत. परिणामी कंपनीला हे मॉडेल बंद करण्यासारखे मोठे पाऊल उचलावे लागले आहे. काळानुरुप गाडीमध्ये बदल केले गेले नसले तरी, या मॉडेलला ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी पाहायला मिळत होती. गतवर्षाच्या ऑक्टोबरपर्यंत मारूतीने ओमनीचे तब्बल १५. ७ मिलियन गाड्यांची विक्री केली होती.

मारुती इको बाजारात

मारुतीने ओमनीचे मॉडेल जरी बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्यासोबतच कंपनीने नवे मॉडेल बाजारात आणले आहे. या मॉडेलचे नाव 'मारुती सुझुकी इको एमपीएव्ही' असे आहे. या गाडीमध्ये अनेक अपडेटेड फिचर्स देण्यात आले आहेत. यात को-ड्रायव्हर सीट बेल्ट रिमायंडर, रिव्हर्स पार्किंग या फिचर्सचा समावेश आहे.

सरकारने ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी केलेल्या नव्या नियमांमुळे या कंपन्यांना आपल्या जुन्या मॉडेलची निर्मिती बंद करावी लागली. सरकारने लागू केलेल्या सुरक्षेबाबतच्या नियमांचे पालन करत मारुतीने इको गाडीमध्ये काही बदल केले आहेत. यात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले सर्व फिचर्सने युक्त गाडी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. या गाडीचे सध्याचे  बाजारमूल्य हे ३ लाख ५५ हजार इतके आहे.