Did CJI DY Chandrachud Asks ₹500: आजचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे असं म्हणतात. तळहातावरील पाच इंचांच्या स्क्रीनवर संपूर्ण जग सामवलेलं असतं, असाच हा काळ. मात्र ज्याप्रमाणे तंत्रज्ञानामुळे सुविधा उपलब्ध झाल्या त्याचप्रमाणे याला नकारात्मक बाजूही आहे. यापैकीच सर्वात मोठी बाजू म्हणजे सायबर क्राइम म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून होणारे गुन्हे! मागील काही काळापासून सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही लोकांना गंडवण्याचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते अगदी मोठे अधिकारी आणि सेलिब्रिटींचीही फसवणूक केली जाते. अनेक नामांकित नावांचा वापर करुन फसवणूक केल्याचे बरेच प्रकार यापूर्वी घडले आहेत. असाच एक प्रकार आता नव्याने समोर आला आहे.
देशातील सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सुप्रीम कोर्टामधील सर्वोच्च पदावरील व्यक्ती म्हणजेच सरन्यायाधीशांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न झाला आहे. देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाने फसवणूक करण्याचा प्रयत्न सायबर चोरांनी केला आहे. हा सारा प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र सरन्यायाधीशासारख्या मोठ्या व्यक्तीचं नाव घेत फसवणूक करण्याची सायबर चोरांची हिंमत कशी झाली असा प्रश्न सोशल मीडियावर अनेकांना पडला आहे.
नक्की वाचा >> Kolkata Rape Case: '150 मिलीग्रॅम वीर्य' असा उल्लेख ऐकताच CJI चंद्रचूड संतापून म्हणाले, 'पीडितेच्या..'
मंगळवारी हा सारा प्रकार घडला. एका व्यक्तीला सायबर चोरांकडून एक मेसेज आला. त्यामध्ये थेट सरन्यायाधीशांच्या नावाने पैसे मागण्यात आले. "हॅलो, मी सरन्यायाधीश आहे. कॉलेजियमबरोबर आमची एक खास बैठक होणार आहे. मी सध्या टॅक्सीमध्ये आहे. कॅनोट प्लेस (नवी दिल्लीमधील एक ठिकाण) येथे मी वाहतूककोंडीत अडकलो आहे. टॅक्सीसाठी मला तुम्ही 500 रुपये देऊ शकता का? तुम्ही है पैसे ट्रान्सफर करु शकता का? मी सुप्रीम कोर्टात पोहचल्यानंतर पैसे परत करेन," असं या मेसेजमध्ये लिहिलं असून. त्यानंतर पुढल्या मेसेजमध्ये टाइप करुन, 'सेंट फ्रॉम आयपॅड' असं लिहिलेलं आहे. म्हणजेच आपण हा मेसेज आयपॅडवरुन पाठवल्याचं या स्कॅमरला भासवायचं होतं.
सध्या हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सरन्यायाधीशांसारख्या नामवंत व्यक्तीला अवघ्या 500 रुपयांसाठी अनोळखी व्यक्तीला का मेसेज करावा लागेल? एवढा साधा विचार तरी फसवणूक करणाऱ्याने करायला हवा होता असं काहींनी या स्कॅमरची खिल्ली उडवताना म्हटलं आहे. तर काहींनी या स्कॅमरचा आयक्यू कमी असल्याची खोचक प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर न्यायव्यवस्थेमधील सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींच्या नावाने फसवणूक करायला एक तर तुम्ही अती शहाणे असला पाहिजे किंवा ठार वेडे, असं एकाने म्हटलं आहे.