Most Loved Car Colour In India: कारची खरेदी म्हटल्यावर बजेटनुसार आधी कोणत्या कंपनीची कार घ्यायची हे निश्चित केलं जातं. त्यानंतर मॉडेल कोणतं घ्यायचं हे ठरतं, मग फिचर्स कोणते हवेत हे निश्चित होतं आणि अगदी शेवटी ठरतो तो कारचा रंग. अर्थात कारचा रंग हा अगदी शेवटी निश्चित केला जात असला तरी तो फार महत्त्वाचा असतो. अनेकदा कारचा हवा तो रंग न मिळाल्याने वर्षवर्ष थांबणारे किंवा थेट दुसऱ्याच कंपनीची कारही विकत घेणारे अनेकजण आहेत. यावरुनच कारचा रंग हा लास्ट बट नॉट द लिस्ट प्रकारातील गोष्ट आहे. मात्र असं असतानाही भारतीय लोक गाडी विकत घेताना एका विशिष्ट रंगाला प्राधान्य देत असल्याची माहिती समोर आली आहे. होय हे खरं आहे. कार विकत घेताना भारतीयांचा सर्वात आवडता रंग किंवा पहिली पसंती कोणत्या रंगाला आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? या लेखामध्ये आपण भारतीय ग्राहक कार घेताना कोणत्या रंगाला किती पसंती देतात हे पाहणार आहोत.
तर भारतात पांढऱ्या रंगाच्या गाड्यांना सर्वाधिक पसंती आहे. जेटो डायनॉमिक्सने केलेल्या एका संशोधनानुसार 2022 मध्ये विक्री झालेल्या गाड्यांपैकी 42.2 टक्के कार्सचा रंग हा पांढरा होता. तर रंगाच्या पसंतीच्या बाबतीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे काळा आणि राखाडी (ग्रे) रंग आहेत. 2022 मध्ये विकल्या गेलेल्या एकूण गाड्यांपैकी 15.50 टक्के गाड्या या काळ्या रंगाच्या होत्या तर 13.30 टक्के गाड्या या ग्रे रंगाच्या होत्या. त्याचप्रमाणे सिलव्हर, निळा आणि लाल सर्वात कमी पसंती असलेला रंग आहे.
पांढऱ्या रंगाच्या गाड्यांना पसंती मिळण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कमी वेटिंग पिरेड. कार विक्री करणारे डिलर्स हे सफेद रंगाच्या गाड्यांचा अधिक स्टॉक आपल्याकडे ठेवतात. त्यामुळे ग्राहकांना या गाड्या सहज उपलब्ध होतात. तर तज्ज्ञांच्या मतानुसार पांढऱ्या गाड्या रस्त्यावर धावात त्या पटकन नजरेत भरतात म्हणजेच त्यांची व्हिजीबिलीटी अधिक असते. पांढऱ्या रंगाच्या गाड्यांमध्ये कलर फेडिंगचा म्हणजेच रंग उडाल्याची समस्या नसते. तसेच या गड्यांवरील डाग पुसणे किंवा डेंट पडल्यास तो लपवणं फारच सोपं असतं.
पांढऱ्या रंगाच्या गाड्या या इतर रंगांच्या गाड्यांच्या तुलनेत कमी तापतात. त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये या गाड्यांमधून प्रवास करणं हे इतर गाड्यांच्या तुलनेत सुखकर असतं. या गाड्यांमध्ये तुलनेनं कमी उष्णता जाणवते. 2022 मध्ये पांढऱ्या गाड्यांची मागणी 3 टक्क्यांनी वाढली आहे. या गाड्यांची एकूण मागणी 55 टक्क्यांवर आहे, असं हुंडाई मोर्टर्सच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
अनेकदा कोणत्या रंगाची कार घ्यायची हे कारच्या प्रकारावर अवलंबून असतं, असतं मारुती सुझुकी इंडियाचं म्हणणं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार स्विफ्ट आणि ऑल्टो सारख्या छोट्या हॅचबॅक गाड्या घेताना लोक लाल रंगाला पसंती देतात. तर सेडान आणि एसयुव्ही घेताना काळा, निळा आणि राखाडी रंगाला ग्राहक प्राधान्य देतात. अनेकदा ग्राहकांवर प्रभाव टाकण्यासाठी गाडीचा रंग महत्त्वाचा ठरतो. याचाच वापर कंपन्या जाहिरातींमध्ये करतात असंही या कंपनीने म्हटलं आहे.
देशातील सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी असलेल्या टाटा मोटर्सनेही पांढऱ्या रंगाच्या कार्सला ग्राहक प्राधान्य असल्याचं म्हटलं आहे. 2022-23 मध्ये टाटाच्या एकूण कारविक्रीपैकी 36 टक्के कार्स या पांढऱ्या रंगाच्या होत्या.