पोपट पिटेकर, झी 24 तास, मुंबई : विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवाच्या कल्याणासाठी आज अनेक दृष्टीने उपयुक्त ठरत आहे. तंत्रज्ञान विकसनामुळे मानवाचं जीवन अधिक सोयीस्कर बनत चालले आहे. नवनवीन शोध लावत मानवानं तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती केली. मानवरहित उडतं वाहन अर्थात 'ड्रोन' हा तंत्रज्ञानाचा असाच एक अविष्कार. 'ड्रोन' चा सोप्या शब्दात अर्थ म्हणजे 'युएव्ही' अर्थात अनमॅन्ड एरियल व्हेइकल. 1900 व्या शतकाच्या सुरुवातीला ड्रोनचं संशोधन सुरु झाल्याचं बोललं जातं. आज ड्रोनचं तंत्र आधुनिक आणि अधिक विकसित झालं आहे.
जगात ड्रोनची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे ड्रोनच्या सहाय्याने अनेक कामं सहजपणे करता येऊ लागली. ड्रोनच्या मदतीने फोटोग्राफीपासून ते अगदी सामानाच्या डिलिवरी केली जाऊ शकते. ड्रोनचा वापर सैन्यातच नव्हे तर जगभरात इतर नागरीकामांसाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.पण तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही ड्रोनचा कशा पद्धतीने क्रिएटिव वापर करता.
बाजारात तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे, तुमच्या कामानुसार आणि क्षमतेनुसार ड्रोन विकत मिळतात. लग्नामधील फोटोग्राफी पासून ते शेतात कीटकनाशक यांच्यावर फावारणी करण्यापर्यंतचे काम ड्रोनच्या मदतीने पूर्ण करू शकता.
पण ड्रोनचा वापर चूकीच्या आणि बेकायदेशीर कामं करण्यासाठी वाढल्याने याचा धोकाही तितकाच वाढला. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अलीकडेच जम्मू मध्ये भारतीय वायुसेना वर हल्ला करण्यासाठी झालेला ड्रोनचा वापर.
यामुळेच ड्रोनचा वापर कोणत्या कामासाठी होतो हे महत्वाचं ठरतं. केंद्र सरकारने या गोष्टींचा विचार करून यंदाच्या वर्षी एक पाऊल उचललं आहे. अनमॅन्ड एयरक्राफ्ट सिस्टम रूल, 2021 (USA rules, 2021) च्या नियमानुसार नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
भारतात वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रोनसाठी हे नियम लागू आहेत. तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे ड्रोन आहेत, त्याचा आकार काय आहे आणि ते कोणत्या कामासाठी वापरलं जाणार आहे, यावर भारतात ड्रोन उडवण्याची परवानगी दिली जाते. यानुसारच ड्रोनच्या वापराची वर्गवारी करण्यात आली आहे.
वजनाने सर्वात हलका म्हणजे नॅनो ड्रोन. 250 ग्रॅम किंवा त्यापेक्षाही कमी वजनांच्या ड्रोनचा समावेश नॅनो ड्रोन प्रकारात येतो. भारत सरकारच्या नियमावली नुसार अशा प्रकारच्या ड्रोन्स उडवण्यासाठी परवानगीची किंवा लायसन्सची गरज नाही.
250 ग्रॅाम ते 2 किलो वजन असलेल्या ड्रोनचा समावेश मायक्रो प्रकारात होतो. तर 2 किलोग्रॅमपेक्षा जास्त आणि 25 किलोग्रॅाम पेक्षा कमी वजन असलेल्या ड्रोन हे स्मॅाल ड्रोनच्या प्रकारात मोडतात. अशा प्रकारचे ड्रोन चालवणाऱ्या व्यक्तीकडे USA ऑपरेटर परमिट -1 ( UAOP- 1) असणं गरजेचं आहे. तसंच ड्रोन चालवणाऱ्या व्यक्तिला स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP)चं पालन करणं गरजेचं आहे.
25 किलोग्रॅाम पेक्षा जास्त आणि 150 किलोग्रॅाम पेक्षा कमी वजन असलेले ड्रोन हे मध्यम प्रकारात येतात. तर मोठ्या कॅटेगिरीत येणाऱ्या ड्रोनचं वजन 150 किलोग्रॅाम पेक्षा जास्त असणं गरजेचं असतं. अशा प्रकारचे ड्रोन उडवण्यासाठी USA ऑपरेटर परमिट -2 (UAOP- II ) असणं बंधनकारक आहे.
अशा प्रकारे ड्रोन उडवण्यासाठी GDCA नी काही अटी घातल्या आहेत. ज्याचं पालन करणं अनिवार्य आहे. उदाहरण द्यायचं झालं तर अशा प्रकारे ड्रोन उडवण्यासाठी हवाई रहदारी आणि हवाई संरक्षण नियंत्रण (AIR DEFENSE CONTROL) यांच्याकडून परवानगी घेणं गरजेचं आहे.
ऑपरेटर सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली (SMS)चं पालन देखील करणं बंधनकारक आहे. UAOP- I आणि UAOP -II ची वैधता 10 वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही.
ऑपरेटर परमिटसाठी दोन प्रकारचे लायसन्स दिले जातात. याला 'स्टूडेंट रिमोट पायलट लायसन्स' आणि 'रिमोट पायलट लायसन्स' म्हणतात. या दोन्ही लायसन्ससाठी अर्जदारचं वय हे 18 वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. हे व्यवसायिक ड्रोन वापरासाठी लागू आहे.
या लायसन्ससाठी कमीत कमी पात्रता ही 10वी पास किंवा दुसरी कोणतीही पदवी असणं गरजेचं आहे. अर्जदाराला DGCA नी दिलेल्या मेडिकल परिक्षा आणि पार्श्वभूमी तपासणी प्रक्रिया सुद्धा करावी लागते.
स्टूडेंट रिमोट पायलट लायसन्स - याची वैधता चालू झाल्यापासून 5 वर्षांपर्यंत मुदत असते. शिवाय अधिकृत संस्थेद्वारा ठरवलेलं शुल्क भरल्यानंतर लायसन्स दिलं जातं. 5 वर्षानंतर याव्यतिरिक्त दोन वर्षासाठी लायसन्सचं नूतनीकरण करता येतं.
रिमोट पायलट लायसन्स - या प्रकारच्या लायसन्सला स्व:ता DGCA नी एक ठरवलेली किंमत वसूल केल्यानंतर लायसन्स दिलं जात. याची वैधता सुरु झाल्यापासून 10 वर्षापर्यंत असते. याचं ट्रेनिंग आणि कौशल्य चाचणी यांच्या आधारावर लायसन्स दिलं जातं. लायसन्सची मुदत संपल्यानंतर पुन्हा नूतनीकरण करता येऊ शकतं.
तुम्ही लायसन्स आणि परवानगी मिळवण्यात यशस्वी झालात तरी देखील ड्रोन उडवण्यासाठी काही नियम आणि अटी यांचं पालन करणं गरजेचं आहे. यामध्ये पहिली अट आहे की बंधी घातलेल्या ठिकाणी तुम्ही ड्रोन उडवू शकत नाही. याव्यतिरिक्त ड्रोन उडवण्याची ऊंची आणि वेग यांचे देखील नियम आहेत.
ते ड्रोनच्या प्रकारावर अंवलबून आहे. मायक्रो ड्रोनला जमीनीपासून 60 मीटर वरती आणि 25 मीटर प्रति सेंकद पेक्षा जास्त वेगाने उडवू शकत नाही. लहान ड्रोनची मर्यादा जमिनीपासून 120 मीटर ऊंच आणि वेग 25 मीटर प्रति सेकंद आहे. याव्यतिरिक्त अजूनही अनेक नियम आहेत. ते जाणून घेण्यासाठी तुम्ही अनमॅन्ड एयरक्राफ्ट सिस्टम नियम, 2021 वाचू शकता.