Electric Cycle: सध्याच्या लाइफस्टाईलमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहे. त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी शारीरिक अॅक्टिव्हिटी आवश्यक आहेत. यासाठी सायकलिंग करून आरोग्य व्यवस्थित ठेवता येईल. यासाठी गेल्या काही दिवसात सायकलची मागणी वाढली आहे. पण सुरुवातीला जोशात सायकलिंग केली जाते आणि नंतर सायकल अडगळीत जाते. यासाठी इलेक्ट्रिक सायकल हा उत्तम पर्याय ठरू शकतो. या सायकलमुळे प्रवासासोबत आरोग्याची काळजी घेता येईल. कॅलिफोर्नियातील एका कंपनीने इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. ही फोल्डेबल इलेक्ट्रिक सायकल आहे. या सायकलला मॉडेल एफ असे नाव देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक सायकलचे वैशिष्टय म्हणजे एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर80 किमी अंतर कापू शकते. तसेच सायकल फोल्ड करून हवे तेथे नेऊ शकता.
कंपनीचा दावा आहे की, मॉडेल एफ इलेक्ट्रिक सायकल एका चार्जवर पेडल असिस्ट वापरून 80 किमी पर्यंत अंतर कापू शकते. पण जर तुम्ही पेडल मारत फक्त इलेक्ट्रिक मोडमध्ये सायकल चालवली तर 40 किमीपर्यंत अंतर कापण्यास सक्षम आहे. या इलेक्ट्रिक सायकलला 750-वॅटची मोटर मिळते. याच्या मदतीने इ-सायकल 40 किमी प्रतितास वेगाने चालवता येईल.
सायकल लो स्टेप-थ्रू हायड्रोफॉर्म्ड अॅल्युमिनियम चेसिसवर तयार केली आहे. या मॉडेल एफ मध्ये 24 इंची चाके देण्यात आली आहेत. टायर तीन इंच रुंद आहेत. ट्रू फॅट टायर्सच्या तुलनेत मॉडेल एफ टायर बलून टायर श्रेणीत येतात. या सायकलची किंमत $1,799 (सुमारे 1,43,700 रुपये) आहे.