सेन्ट फ्रान्सिस्को : फेसबुकवर बोगस आणि खोट्या बातम्या, माहिती सर्रास शेयर केली जाते. यावर निर्बंध घालण्यासाठी या बोगस बातम्या आणि माहिती शेयर करणाऱ्या पेजला जाहिराती देणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
'टेकक्रंच' या वेबसाईटच्या वृत्तानुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अशाप्रकारच्या बातम्या किंवा माहिती विवादग्रस्त म्हणून मार्क करेल आणि ही माहिती ज्या पेजकडून शेयर केली जाईल त्यांना जाहिराती मिळणार नाहीत. यासाठी फेसबुकने बातम्यांची सत्यता पडताळून बघण्यासाठी 'स्नोप्स' आणि 'एपी' या वेबसाईटशी हातमिळवणी केली आहे.
अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळेस अशा बोगस बातम्या शेयर झाल्यामुळे फेसबुकला अनेक टीकांना सामोरे जावे लागले होते. या गेल्या वर्षीच्या अनुभवातून धडा घेत फेसबुकने हे पाऊल उचलले आहे.
फेसबुकचे प्रॉडक्ट डायरेक्टर रॉब लीथर्न यांनी सांगितले की, "फेसबुक यावर तीन प्रकारे उपाययोजना करत आहे. एकतर बोगस बातम्या शेयर करणाऱ्यांना जाहिरातीतून मिळणारा आर्थिक लाभ मिळणार नाही. दुसरं म्हणजे या बातम्या पसरण्याचे प्रमाण आणि वेग यावर नियंत्रण आणण्यात येईल. आणि तिसरं म्हणजे अशाप्रकारच्या बोगस बातम्या समोर आल्यावर त्यासंबंधित व्यक्तीला सूचित करण्यात येईल."