Google आणि Apple कडून 8 लाखहून अधिक App बॅन

तुमच्या फोनमध्ये जर चुकून हे अॅप्स असतील तर आजच डिलीट करा अन्यथा होऊ शकतं नुकसान गुगलकडून अलर्ट जारी

Updated: Sep 23, 2021, 07:11 PM IST
Google आणि Apple कडून 8 लाखहून अधिक App बॅन

मुंबई: गुगल प्ले स्टोरवरून आपण वेगवेगळे अॅप्स डाऊनलोड करत असतो. त्यामध्ये कोणतीही टर्म आणि कंडिशन्स न वाचता सगळ्या पॉलिसी स्वीकारून अॅप पुढे सुरू करतो. पण ते अॅप खरंच सुरक्षित आहे की नाही याचा कोणताही विचार करत नाही. आता गुगल आणि अॅपल कंपनीने मिळून प्ले स्टोरवरून 8 लाखहून अधिक अॅप्स डिलीट केले आहेत. 

8 लाखहून अधिक अॅप्स हे फोनमधील डेटा लीक किंवा चोरी किंवा हानी पोहोचवण्याचे काम करत होते. त्यामुळे सुरक्षा धोक्यात येऊ शकत होती. या सगळ्याचा विचार करून गुगल आणि अॅपल कंपनीने प्ले स्टोरवरील 8 लाखहून अधिक अॅप्सवर बंदी घातली आहे. Pixalate च्या 'H1 2021 डिलिस्टेड मोबाईल अॅप्स रिपोर्ट'मधून ही माहिती समोर आली आहे. 2021 च्या पहिल्या सहा महिन्यात 8,13,000 पेक्षा जास्त अॅप्स हटवण्यात आले जे लोकांच्या गोपनीयतेसाठी धोका निर्माण करणारे होते.

मिळालेल्या माहितीनुसार हटवण्यात आलेले हे अॅप्स9 अब्ज वेळा गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करण्यात आले होते. त्याच वेळी, कॅलिफोर्नियाच्या पिक्सलेटच्या मते, या अॅप्सला अॅपलच्या अॅप स्टोअरमधून काढण्यापूर्वी 2.1 कोटी युझर्सकडून रिव्ह्यू आणि रेटिंग देण्यात आले होते. अॅप स्टोअरमधून काढून टाकले गेले असले तरी, लाखो युझर्स अजूनही त्यांच्या स्मार्टफोनवर हे अॅप वापरत असतील. मात्र त्यांनी ही अॅप तातडीनं डिलीट करणं अत्यावश्यक आहे. 

अहवालानुसार, गुगल प्ले स्टोअरवरील 86 टक्के मोबाईल अॅप्स आणि अॅपल अॅप स्टोअरवरील 89 टक्के मोबाईल अॅप्स 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना टार्गेट करत आहेत. हे देखील लक्षात घेतले आहे की 25 टक्के प्ले स्टोअर अॅप्स आणि 59 टक्के अॅप स्टोअर अॅप्समध्ये कोणतेही गोपनीयता धोरण नव्हते. अहवालात पुढे असे म्हटले आहे की, 26 टक्के अॅप्स रशियन गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आणि 60 टक्के अॅप्स चीनी अॅप स्टोअरवर लिस्टेड करण्यात आले. चिनी अॅप स्टोअरवर कोणतेही गोपनीयता धोरण नव्हते.

कारवाईनंतर काढण्यात आलेले जवळजवळ 66 टक्के Google अॅप्सना किमान एक धोकादायक परवानगी होती. रनटाइम परमिशनमुऴे हे अॅप्स मोबाईलच्या सिस्टिमवर आणि इतर अॅप्सवर परिणाम करतात. हटवण्यात आलेल्या अॅप्सना कॅमेऱ्याची देखील परवानगी होती. धक्कादायक बाब म्हणजे त्यामध्ये GPS कोरनिडेट करण्यात येणार होता. त्यामुळे मोबाईलमधील गोपनीयता धोक्यात येणार होती. 

गुगल किंवा अॅपल प्ले स्टोअर वरून कोणतंही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची माहिती पूर्ण वाचा. कोणत्याही थर्ड पार्टी अॅपला थेट प्रवेश मोबाईलमध्ये देणं म्हणजे आपल्या गोपनीय माहितीला अनोळखी व्यक्तीच्या स्वाधीन करण्यासारखं आहे. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि सायबर क्राइम आपल्यासोबत होणार नाही याची काळजी घ्या.