नवी दिल्ली : भारत सरकारने कारमध्ये लावण्यात येणा-या बंपर गार्ड(बुलबार्स)वर बंदी आणली आहे.
मिनिस्ट्री ऑफ रोड, ट्रान्सपोर्ट अॅन्ड हायवेजने आपल्या एका आदेशात राज्यांना अशा बेकायदेशीर बंपर गार्ड लावण्यावर कठोर कारवाई करण्याचे सांगितले आहे. सरकारने सांगितले की, ‘कारमध्ये असे बुलबार्स लावणे मोटार व्हेईकल अॅक्ट १९८८च्या सेक्सन ५२ चं उल्लंघन आहे.
सरकारने ही बंदी आणण्याचे कारण असे की, अशा बंपर गार्डने केवळ रस्त्यावर चालणा-यांना त्रास होतो इतकेच नाहीतर अपघात झाल्यास गाडीतील व्यक्तींचेही याने नुकसान होऊ शकतं. गेल्या काही वर्षांपासून भारतात गाड्यांसाठी अशा बंपर गार्डचा वापर केला जात आहे. गाड्या विकणा-या शोरूम्समध्येही हे उपलब्ध असतात.
लोकांमध्ये असा समज आहे की, लहान-मोठी टक्कर झाल्यावर अशा बंपर गार्डने कारच्या बॉडीचं रक्षण होतं. पण तज्ञांचं म्हणनं आहे की, भीषण टक्कर झाल्यावर हे गार्ड गाडीच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतं. हे बंपर गार्ड कारच्या २ पॉईंटवर फिक्स केलं जातं. टक्कर झाल्यास क्रॅश एनर्जी केवळ या दोन पॉईंटवर येतं. याने गाडीचं नुकसान अधिक होण्याची शक्यता असते.
कारमधील एअरबॅग्सचे सेंसर पुढे लावले जातात. बंपर गार्ड लावल्याने हे सेंसर काम करु शकत नाही आणि टक्कर झाल्यावर एअरबॅग्स उघडू शकत नाहीत. तज्ञांचं म्हणनं आहे की, कंपन्या कार्स अशा डिझाईन करतात जेणेकरून रस्त्यावर चालणा-या लोकांना धडक दिल्याच त्यांचं जास्त नुकसान होऊ नये. पण बंपर गार्ड लावल्याने टक्कर झाल्यास जास्त नुकसान होऊ शकतं.