Jio AirFiber launched: आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विविध टेक,ऑटो क्षेत्रातील कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स आणत आहेत. यात अंबनींची जिओदेखील मागे नाही. मोबाईल क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केल्यानंतर आता मुकेश अंबानी यांनी देशातील 8 मेट्रो शहरांमध्ये Jio AirFiber लाँच केले आहे. जिओ एअर फायबर होम एंटरटेनमेंट, स्मार्ट होम सर्व्हिस आणि हाय-स्पीड ब्रॉडबँड यांसारख्या सेवा प्रदान करेल. कंपनीने दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि पुणे या प्रमुख शहरांमध्ये जिओ फायबर लॉंच केले आहे. जिओची ऑप्टिकल फायबर पायाभूत सुविधा संपूर्ण भारतात 15 लाख किमी पसरलेली आहे. पण आताही कोट्यवधी संकुले आणि घरांमध्ये वायर जोडणे अत्यंत अवघड आहे. यामुळे लास्ट माईल कनेक्टिव्हिटीची अडचण कमी होणार आहे. तसेच या जिओ फायबरच्या माध्यमातून 20 कोटी घरे आणि परिसरापर्यंत पोहोचण्याचे अंबानी ग्रुपचे ध्येय आहे. मुकेश अंबानी यांनी 29 ऑगस्ट रोजी रिलायन्सच्या एजीएममध्ये Jio AirFiber लाँच करण्याची घोषणा केली होती.
जिओ फायबर इंटरनेट जगतात हे एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे. कंपनीने एअर फायबर आणि एअर फायबर मॅक्स नावाच्या दोन योजना बाजारात आणल्या आहेत. एअर फायबर प्लॅनमध्ये ग्राहकांना दोन प्रकारचे स्पीड प्लॅन देण्यात आले आहेत. यामध्ये 30 एमबीपीएस आणि 100 एमबीपीएसचा समावेश आहे. कंपनीच्या सुरुवातीच्या 30 Mbps प्लॅनची किंमत 599 रुपये आहे. तर 100 Mbps प्लॅनची किंमत 899 रुपये ठेवण्यात आली आहे.
दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना 550 हून अधिक डिजिटल चॅनेल आणि 14 मनोरंजन अॅप्स मिळणार आहेत. एअर फायबर प्लॅन अंतर्गत, कंपनीने 100 एमबीपीएस स्पीडसह 1199 रुपयांचा प्लॅन देखील सादर केला आहे. यामध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन आणि जिओ सिनेमा सारखे प्रीमियम अॅप्स देखील उपलब्ध असतील.
जास्त इंटरनेट स्पीड हवा असलेले ग्राहक ‘एअर फायबर मॅक्स’ प्लॅनपैकी एक निवडू शकतील. कंपनीने बाजारात 300 Mbps ते 1000 Mbps म्हणजेच 1 Gbps पर्यंतचे तीन प्लॅन लॉन्च केले आहेत. 300 Mbps चा स्पीड 1,499 रुपयांना मिळेल. ग्राहकाला 2,499 रुपयांमध्ये 500 Mbps पर्यंत स्पीड मिळणार आहे. 1 Gbps स्पीडचा प्लान घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकाला 3,999 रुपये खर्च करावे लागतील. 550 हून अधिक डिजिटल चॅनेल, 14 मनोरंजन अॅप्स आणि नेटफ्लिक्स, अॅमेझॉन आणि जिओ सिनेमा सारखी प्रीमियम अॅप्स देखील सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे.