मुंबई : पाच कोटी फेसबुक यूझर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर झाल्याप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं माफीनामा सादर केलाय. फेसबुकच्या यूझर्सनी शेअर केलेली माहिती जपण्याची जबाबदारी कंपनीची आहे. जर, अशी माहिती लीक झाली असेल, तर ती कंपनीची चूक आहे. असं झुकरबर्गनं त्याच्या फेसबुक पेजवर म्हटलंय.
यापुढे अशी डेटा चोरी होऊ नये याची खबरदारी घेतली जाईल असंही झुकरबर्गनं स्पष्ट केलंय. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या काळात फेसबूकच्या पाच कोटी यूझर्सची खासगी माहिती केम्ब्रिज अॅनालिटीका नावाच्या एका कंपनीनं वापरली. त्याआधारे नागरिक मतदानात कोणत्या पक्षाला करतील याचा अंदाज बांधल्याचं अमेरिकन तपास यंत्रणांच्या चौकशीत पुढे आलंय. प्रकरण उघड झाल्यापासून फेसबुककडून कुणीही प्रतिक्रिया दिली नव्हती. बुधवारी झुकरबर्ग आणि त्याच्या कंपनीच्या सीईओ सीरील सँडबर्ग यांनी फेसबूक पोस्टद्वारे आपली दिलगिरी व्यक्त केली.