Matrimonial Site वर शोधताय आयुष्यभराचा जोडीदार? 'या' चुका अजिबात करु नका

नाहीतर पश्चातापाची वेळ येईल  

Updated: Aug 3, 2022, 01:21 PM IST
Matrimonial Site वर शोधताय आयुष्यभराचा जोडीदार? 'या' चुका अजिबात करु नका  title=
Marriage How To Search Life Partner On Matrimonial Site useful tips

Precautions While Searching For Life Partner On Matrimonial Site: मुला- मुलीचं लग्नाचं वय झालं, की कुटुंबीयांची त्यांच्यामागे एकच भुणभूण सुरु होते. ती म्हणजे लग्नाची. योग्य वयात लग्न झालेलं बरं, असं म्हणत वडिलधारे लग्नासाठी आग्रही असतात. अखेर मग मोठा निर्णय घेत सध्याच्या दिवसांमध्ये Matrimonial Site वर मॅचमेकिंग अर्थात सुयोग्य जोडीदाराचा शोध सुरु होतो. 

आपली साथ कधीच सोडणार नाही यासाठी विवाहोत्सुक तरुण- तरुणी काही संकेतस्थळांवर नावनोंदणी करतात. आधुनिक युगातलं हे वधू-वर सूचक मंडळच आहे, असं म्हणायला हरकत नाही. पण, इथं नावनोंदणी केल्यापासून जोडीदार निवडेपर्यंत बरेच बारकावे लक्षात घेणं गरजेचं असतं अन्यथा तुमची फसवणूकही होऊ शकते. 

Matrimonial Site वरून जोडीदार निवडताना काय काळजी घ्यावी? 
समोरच्या व्यक्तीची प्रोफाईल तपासून पाहा - लग्नासाठी ज्यावेळी तुमच्याकडे एखादं प्रोफाईल येतं तेव्हा ती व्यवस्थित तपासून पाहा. त्या व्यक्तीचे सोशल मीडिया अकाऊंट्स पाहा. प्रोफाईलवर ही व्यक्ती किती सक्रिय आहे, या व्यक्तीच्या आवडीनिवडी काय आहेत, प्रोफाईल फोटो कसा आहे यावर लक्ष द्या. 

अनेकदा चुकीचा फोटो आणि फसवी माहिती दाखवून लोक फसवणूक करण्याचा सापळा रचतात. पण, असं तुमच्यासोबत होऊ देऊ नका. काहीही शंका आल्यास त्या व्यक्तीशी बोलणं त्या क्षणी थांबवा. 

आर्थिक नुकसान होऊ देऊ नका- प्रत्यक्ष आयुष्यात असो किंवा मग इंटरनेटच्या माध्यमातून असो. फसवणूक होण्यामागचं मुख्य कारण असतं पैसा. परिणामी मॅट्रीमोनियल साईटवर कोणा दुसऱ्या व्यक्तीला तुमचा प्रस्ताव पाठवताना काही गोष्टींची काळजी घ्या. 

प्रोफाईलवर असा ईमेलआयडी किंवा दूरध्वनी क्रमांक द्या, जो तुमच्या बँक खात्यामध्ये रजिस्टर नाही. कोणाही तरुण किंवा तरुणीशी संपर्क करताना फोनवरील बोलण्यानंतर लगेचच पैशांची देवाणघेवाण करु नका. 

पेड आणि वेरिफाईड मेंबर्सच निवडा- लग्न हा आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय आहे. त्यामुळं अनधिकृत आणि बनावट वेबसाईटसोबतच अशा प्रोफाईल्सपासूनही दूर राहा. निवड करण्यासाठीच्या निकषांमध्ये पेड आणि वेरिफाईड मेंबर्सनाच कायम प्राधान्य द्या. 

(वरील माहिती सर्वसामान्य अनुभवांतून घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )