Alto With Sunroof: मारुति सुझुकीच्या काही गाड्यांकडे सर्वसामान्याच्या खिशाला परवडणाऱ्या गाड्या म्हणून पाहिलं जातं. कंपनीच्या अल्टो गाडीला कारप्रेमींची सर्वाधिक पसंती असते. कारण ही गाडी बजेटमध्ये असून जवळपास सर्व गरजा भागवणारी आहे. देशातील सर्वात मायलेज देणारी कार म्हणून देखील अल्टोकडे पाहिलं जातं. कंपनी ऑगस्टमध्ये अपडेटेड अल्टो लाँच करण्याची तयारी करत आहे. रिपोर्टनुसार, मारुति सुझुकी 18 ऑगस्टला अल्टो लाँच करण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर लीक झालेल्या फोटोंवरून तरी नवीन अल्टोचं डिझाईन अपडेट केल्याचं दिसत आहे. नव्या अल्टोमध्ये सेलेरियोची झलक दिसते. 2022 मारुति सुझुकी अल्टोत अपडेटेड पावरट्रेन असण्याची अपेक्षा आहे. अपडेटेड एस-प्रेस्सोसारखी आगामी अल्टोमध्ये K10C 1.0 लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. नवं 1.0 लिटर इंजिन 66 बीएचपी आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. तर जुनी 0.8 लिटर युनिट 47 बीएचपी आणि 69 एनएम टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटीचा पर्याय मिळू शकतो. त्याचबरोबर गाडी सीएनजी वर्जनमध्ये सादर केली जाऊ शकते.
दुसरीकडे, अल्टोमध्ये फक्त सनरूफ असतं तर बरं झालं असतं, असं अनेकांची इच्छा आहे. आता ही इच्छा यूट्यूबवरील व्हिडीओ पाहिल्यावर पूर्ण होईल, असं वाटू लागलं आहे. गाडी विकत घेतल्यानंतर मॉडिफाय करून सनरूफ इन्स्टॉल केलं जाऊ शकतं. कंपनी अल्टोमध्ये सनरूफ देत नाही. मारुति सुझुकीने नुकतीच 2022 मारुति सुझुकी ब्रेजा फेसलिफ्ट लाँच केली आहे. या गाडीमध्ये कंपनीने सनरूफ दिलं होतं. त्यानंतर ग्रँड विटारामध्येही कंपनीने सनरूफ दिलं आहे. यापूर्वी कंपनीने कोणत्याही कारमध्ये सनरूफ दिलं नव्हतं. जर तुम्हाला अल्टोमध्ये सनरूफ हवं असेल तर तुम्ही मॉडिफाय करून सनरूफ लावू शकता. पण ऑफ्टरमार्केट सनरूफ लावण्याचे काही तोटे देखील आहेत, जाणून घेऊयात.
ऑफ्टरमार्केट सनरूफ इन्स्टॉल केल्याने कारची सेफ्टी कमी होते. कारण गाडीचं छत कापून सनरूफ लावलं जातं. त्याबरोबर लावलेलं सनरूफ व्यवस्थितरित्या ऑपरेट होईल की, याबाबत देखील शंका आहे. पावसाळ्यात यातून आतमध्ये पाणी गळू शकते. त्यामुळे गाडीचं नुकसान होऊ शकतं.