Maruti Suzuki Fronx: मारुती सुझुकी कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये एक दमदार गाडी लॉन्च करणार आहे. या गाडीचं नावं आहे मारुती फ्रोंक्स! कंपनीने याच वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात झालेल्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये फ्रोंक्सची पहिली झलक दाखवली होती. तसेच त्यानंतर लगेच या गाडीची बुकिंगही सुरु करण्यात आली होती. विशेष म्हणजे या गाडीला प्रचंड मागणी असून प्री बुकींगमध्येच गाडीचे 15 हजारांहून अधिक युटीन्स बुक झाले आहेत. गाडीला मिळणारा प्रतिसाद पाहून कंपनीने अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता गाडीच्या मायलेजची घोषणा केली आहे.
मारुती सुझुकी फ्रोंक्सच्या 1.2 लिटरच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंटचं मायलेज 22.89 किमी प्रति लिटर इतकं आहे. हे व्हेरिएंट सर्वाधिक मायलेज देणारं आहे. तर सर्वात कमी मायलेज देणारं व्हेरिएंट हे 1.0 लिटर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन इंजिनचं आहे. हे इंजिन केवळ 20 किमी प्रति लिटरचं मायलेज देतं. एसयुव्ही श्रेणीमधील ही गाडी 2 इंजिनच्या पर्यायासहीत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या गाडीच्या सर्व व्हेरिएंटचं प्रति लिटर मायलेज हे 20 किमीहून अधिकच आहे. फ्रोंक्सच्या वेगवेगळ्या मॉडेलचं मायलेज किती आहे पाहूयात...
फ्रोंक्स 1.0 एमटी - 21.5 किमी प्रति लिटर
फ्रोंक्स 1.0 एटी - 20.01 किमी प्रति लिटर
फ्रोंक्स 1.2 एमटी - 21.79 किमी प्रति लिटर
फ्रोंक्स 1.2 एएमटी - 22.89 किमी प्रति लिटर
मारुती सुझुकी फ्रोंक्सचे दोन इंजिन पर्याय उपलब्ध असून यापैकी पहिला पर्याय 1.0 लिटर टर्बो जेट पेट्रोलचा आहे तर दुसरा 1.2 लिटर ड्युएल जेट वीवीटी पेट्रोलचा आहे. 1.0 लिटर इंजिनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गेअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच 1.2 लिटर इंजिनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड ऑटोमॅटिक पर्याय कंपनीने दिला आहे. मारुतीची ही नवीन गाडी लांबीला 3,995 मिमी आणि रुंदीला 1,550 मिमी इतकी आहे. गाडीचा व्हेइकल बेस हा 2,520 मिमी इतका आहे.
एका अंदाजानुसार मारुती सुझुकी फ्रोंक्सची किंमत भारतामध्ये 6.75 लाख ते 11 लाखांदरम्यान असू शकते. भारतीय बाजारपेठेमध्ये ही कार टाटा नेक्सन, हुंडाई व्हेन्यू आणि किया सॉनेटला टक्कर देईल. पुढील आठवड्यामध्ये ही कार बाजारपेठेत दाखल होईल अशी माहिती समोर येत आहे.