देशातील नागरिक आता कार विकत घेताना किंमतीपेक्षा फिचर्स आणि परफॉर्मन्स याकडे जास्त लक्ष देत असल्याचं दिसत आहे. याचं कारण मारुतीची सर्वात स्वस्त कार म्हणून ओळखली जाणारी Alto ची आकडेवारी सतत घसरताना दिसत आहे. सर्वात आश्चर्याचा गोष्ट म्हणजे, ही कार टॉप 10 विकल्या जाणाऱ्या गाड्यांच्या यादीतहूनही बाहेर पडली आहे. वाहन निर्माता कंपन्यांनी जुलै महिन्यात विक्री झालेल्या गाड्यांची आकडेवारी सादर केली असून, हा रिपोर्ट भुवया उंचावणारा आहे. देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 10 कारमध्ये 8 कार मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणती गाडी आहे हे जाणून घ्या...
मारुती सुझुकीचा स्विफ्ट जुलै महिन्यात देशातील सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली आहे. कंपनीने या कारच्या एकूण 17 हजार 896 युनिट्सची विक्री केली आहे. एकूण चार व्हेरियंटमध्ये येणाऱ्या या स्विफ्ट कारची किंमत 5 लाख 99 हजारांपासून ते 9 लाख 3 हजारांपर्यंत आहे. महत्त्वाचं म्हणजे, या कारमध्ये फार काळापासून काही नवे अपडेट देण्यात आलेले नाहीत. तरीही लोकांमध्ये या कारबद्दल प्रचंड वेड आहे.
1.2 लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिनसह येणारी ही हॅचबॅक सीएनजी व्हेरियंटमध्येही उपलब्ध आहे. सामान्यपणे या कारचं पेट्रोल व्हेरियंट 22 किमी/लीटर आणि सीएनजी व्हेरियंट 30 किमीपर्यंतचा मायलेज देत आहे.
देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये Maruti Baleno ने बाजी मारली आहे. कंपनीने जुलै महिन्यात या कारच्या एकूण 16 हजार 725 युनिट्सची विक्री केली आहे. नेक्सा डिलरशिपच्या माध्यमातून विकल्या जाणाऱ्या या कारचे सिग्मा, डेल्टा, जेटा आणि अल्फा असे 4 व्हेरियंट उपलब्ध आहेत. याची किंमत 6 लाख 61 हजार ते 9 लाख 88 हजार इतकी आहे.
कंपनीने या कारमध्येही 1.2 लीटर क्षमतेचं पेट्रोल इंजिन वापरलं असून, यातही सीएनजी व्हेरियंट उपलब्ध आहे. याचं पेट्रोल व्हेरियंट 22 किमी/लीटर आणि सीएनजी व्हेरियंट 30 किमी\किलो पर्यंतचा मायलेज देते. प्रीमियम हॅचबॅक असल्याने या कारमध्ये अनेक अॅडव्हान्स फिचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये 6 एअरबॅग मिळतात.
ब्रेझा जुलै महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी तिसरी कार ठरली आहे. कंपनीने या एसयुव्हीच्या एकूण 16 हजार 543 युनिट्सची विक्री केली आहे. याची किंमत 8 लाख 29 हजार ते 14 लाख 14 हजारांपर्यंत आहे. एकूण चार व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असणारी ही कार CNG व्हेरियंटमध्येही उपलब्ध आहे. कंपनीने या एसयुव्हीमध्ये 1.5 लीटर क्षमतेच्या पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे. याचं पेट्रोल व्हेरियंट 17 किमी\लीटर आणि सीएनजी व्हेरियंट 25 किमी\किलोपर्यंत मायलेज देते. यामध्ये 360 डिग्री कॅमेरा, हेड-अप डिस्प्लेसाऱेक फिचर्स मिळतात.
फॅमिली कार म्हणून प्रसिद्ध असणारी मारुती अर्टिगा देशातील चौथी सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कंपनीने कारच्या एकूण 14 हजार 352 युनिट्सची विक्री केली आहे. 7 सीटर या एमपीव्हीमध्ये कंपनीने 1.5 लीटर क्षमतेचं पेट्रोल इंजिन वापरलं आहे. 7-सीटर असतानाही या कारमध्ये 209 लीटरचा बूट स्पेस मिळतो. दर दुसऱ्या रांगेतील सीट फोल्ड केल्यानंतर या बूट स्पेस 550 लीटपर्यंत वाढतो. ही कार CNG पर्यायातही उपलब्ध आहे. सामान्यपणे या कारचं पेट्रोल व्हेरियंट 18-20 किमी\लीटर आणि सीएनजी व्हेरियंट 26 किमी\किलोपर्यंत मायलेज देतं. या कारची किंमत 8 लाख 64 हजार ते 13 लाख 8 हजारांपर्यंत आहे.
टॉप 5 सर्वाधिक विक्री झालेल्या गाड्यांच्या यादीत दोन हॅचबॅक आणि तीन युटिलिटी गाड्या आहेत. जुलै महिन्यात हुंडाई क्रेटा देशातील सर्वाधिक विक्री होणारी पाचवी कार ठरली आहे. कंपनीने या कालावधीत 14 हजार 62 युनिट्सची विक्री केली. याची किंमत 10 लाख 87 हजार ते 19 लाख 20 हजारांपर्यंत आहे. ही एसयुव्ही 1.5 लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे. ही एसयुव्ही एकी लीटरला 17 ते 20 किमीचा मायलेज देते. कंपनी लवकरच या कारचं नेक्स जनरेशन मॉडेल बाजारात आणणार आहे. 2020 मध्ये कंपनीने ही कार लाँच केली होती.