मोबाईल घेतल्यानंतर आयुष्यभर चार्जिंगला लावायची गरजच नाही! एका चार्जमध्ये 'इतकी' वर्षं चालणार बॅटरी

Mobile Phone Charging for Lifetime: तुम्ही दिवसातून कितीवेळा मोबाईल चार्ज करता? 3 ते 4 किंवा अगदी कमी म्हटलं तरी 1 किंवा 2 वेळा तरी करत असाल. पण कधीच चार्ज न करावा लागणारा फोन येतोय असं सांगितलं तर?

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 15, 2024, 04:17 PM IST
मोबाईल घेतल्यानंतर आयुष्यभर चार्जिंगला लावायची गरजच नाही! एका चार्जमध्ये 'इतकी' वर्षं चालणार बॅटरी title=
चीनमधील कंपनीने बनवली आहे ही बॅटरी (प्रातिनिधिक फोटो)

Mobile Phone Charging for Lifetime: माहिती तंत्रज्ञान श्रेत्र झपाट्याने कात टाकत आहे. रोज नवीन तंत्रज्ञानाबद्दल ऐकायला, पाहायला आणि वाचायला मिळत आहे. स्मार्टफोनच्या या जगामध्ये दिवसोंदिवस स्मार्टफोन अधिक अधिक सक्षम होताना दिसत आहेत. तुम्ही सांगाल ती सेवा पुरवण्यासाठी तुमच्या खिशात असलेली ही 5 इंचांची स्क्रीन सक्षम आहे आणि ती अधिक अपडेट होत आहे. ज्याप्रमाणे मोबाईल फोनचा वापर आणि त्यामधील सेवा वाढत आहेत त्याचप्रमाणात मोबाईलमधील बॅटरी, स्क्रीन आणि इतर बेसिक गोष्टीही अपडेट होत आहेत. मात्र मागील काही वर्षांमध्ये ज्याप्रमाणात मोबाईलची मेमरी, स्क्रीन, आकार आणि वापर वाढला त्याप्रमाणात बॅटरी क्षेत्रात बदल झालेला दिसत नाही. ज्या वेगात इतर गोष्टी बदलल्या त्या वेगात मूलभूत बदल मोबाईल बॅटरीमध्ये झाले नाही फक्त त्यांची क्षमता वाढत गेली. पण आता अण्विक बॅटरी म्हणजेच न्यूक्लिअर बॅटरींमुळे या क्षेत्रातही क्रांती येईल असं चित्र दिसत आहे. 

कोणती आहे ही कंपनी?

चीनमधील बीटावोल्ट टेक्नोलॉजी या कंपनीने रेडिओन्यूक्लाइड बॅटरी तयार केली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर काही तास किंवा दिवस नाही तर तब्बल 50 वर्ष चालू शकते. म्हणजेच ही बॅटरी फोनमध्ये असेल तर तुम्हाला तुमचा फोन कधीच चार्ज करावा लागणार नाही. आता ही बॅटरी मोबाईल फोनच्या क्षेत्रात कशापद्धतीने क्रांती आणू शकते हे जाणून घेऊयात.

नेमकं तंत्रज्ञान काय?

बीटावोल्ट टेक्नोलॉजीची ही बॅटरी अण्विक ऊर्जेवर काम करते. ही बॅटरी अण्विक ऊर्जेवर काम करणारी असली तरी ती स्मार्टफोनमध्ये सहज फीट होते. तसेच एकदा ही बॅटरी लावल्यानंतर ती सलग 50 वर्ष डिस्चार्ज न होता काम करु शकते. या तंत्रज्ञानाचा वापर हृदयात बसवल्या जाणाऱ्या पेसमेकर्समध्ये केला जातो. हे एक छोटं बॅटरीवर चालणारं उपकरण असतं जे हृदयासंदर्भातील रुग्णांच्या हृदयाची गती कायम राखण्यासाठी वापरलं जातं. याचा वापर अंतराळामध्ये प्रवास करणाऱ्या अंतराळयानांमध्येही ज्या घटकांसाठी केला जातो ज्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याची आवश्यकता असते. अगदी सूर्यप्रकाशापासून अब्जावधी किलोमीटर दूर असलेल्या यानांमध्येही हे तंत्रज्ञान वापरलं जातं. 

आतापर्यंत यश नाही कारण...

स्मार्टफोनसाठी अण्विक बॅटरी निर्माण करण्याचे प्रयत्न आतापर्यंत यशस्वी होऊ शकले नव्हते. यामागील मुख्य कारण म्हणजे या बॅटरीचा आकार फार मोठा असायचा. या बॅटरीमधून स्मार्टफोनला गरज असलेल्या क्षमतेनुसार ऊर्जा पुरवता येत नव्हती. स्मार्टफोनमध्ये प्लुटोनियम आणि रेडिओअॅक्टीव्ही गोष्टींचा वापर करणं धोकादायक ठरतं. त्यामुळे बीटावोल्ट टेक्नोलॉजीने यावेळेस एक वेगळा पर्याय निवडला आहे. त्यांनी एक रेडिओन्यूक्लाइड बॅटरी तयार करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. या बॅटरीवर कृत्रिम हिऱ्याचं एक पातळ आवरण असेल. या आवरणामुळे आतील किरणोत्सर्ग करणाऱ्या पदार्थाचा परिणाम वापरणाऱ्यावर होत नाही. यामध्ये निकल आयसोटोपच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती केली जाते. 

कंपनीला काय करायचं आहे

या अण्विक बॅटरी सध्याच्या लिथियम बॅटरींच्या तुलनेत 10 पट अधिक ऊर्जा घनत्व असलेल्या आहेत. अण्विक बॅटरीतील 1 ग्राम बॅटरीमध्ये 3,300 मेगाव्हॅट तासांपर्यंतची क्षमतेची ऊर्जा साठवू शकतो. ही बॅटरी खराब होत नाही. यावर वातावरण किंवा दबावाचा परिणा होत नाही कारण यामाधील वीज निर्मिती स्थीर असते. पुढील 2 वर्षांमध्ये एक व्हॅटपर्यंत वीज निर्माण करणारं तंत्रज्ञान तयार करण्याचं कंपनीचं उद्देश आहे. या तंत्रज्ञानाची चांगली गोष्ट म्हणजे कोणतंही उत्सर्जन होत नाही. निकल आयसोटोपचं रुपांतर तांब्यात होतं. म्हणजे यामधून कोणताच विषारी पदार्थ तयार होत नाही. मात्र हे तंत्रज्ञान सर्वांना वापरण्यासाठी अजून काही काळ जावा लागणार आहे.