मुंबई : टेलिकॉम इंडस्ट्रीमधील प्रत्येक कंपनी आपले यूजर्स कायम ठेवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करतात. इंटरनेट डाटाच्या किंमतीही कमी केल्या जाताय. दोन आठवड्यांपूर्वी रिलायन्स जिओने १०० टक्के कॅशबॅकचा नवा प्लान आणला होता.
जिओला टक्कर देण्यासाठी आता एअरटेलनेही नवा प्लान आणलाय. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना ३४९ रुपयांच्या रिचार्जवर ३४९ रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. याचाच अर्थ तुम्हाला रिचार्जसाठी एकही रुपया द्यावा लागणार नाही.
दरम्यान, हा कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला एअरटेल पेमेंट बँकच्या माध्यामातूनच रिचार्ज करणे गरजेचे आहे. याआधी जिओने दिवाळीमध्ये हा प्लान आणला होता. जिओच्या प्लानमध्ये ३९९ रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना ४०० रुपयांचे कॅशबॅक मिळत होते. हा कॅशबॅक ५०-५० रुपयाच्या ८ स्लॉटमध्ये दिला जात होता.
एअरटेलच्या नव्या ऑफरमध्ये ग्राहक ३४९ रुपयांचा कॅशबॅकचा वापर सात महिन्यांपर्यंत करु शकतात. जेव्हा तुम्ही एअरटेल पेमेंट बँकेच्या माध्यमातून ३४९ रुपयांचे रिचार्ज कराल तेव्हा पुढील रिचार्जवर तुम्हाला ५० रुपयांची सूट मिळेल. ५० रुपयांचा कॅशबॅक तुमच्या एअरटेल पेमेंट बँक अकाऊंटमध्ये जमा होईल. जर तुम्ही या महिन्याला ३४९ रुपयांचा रिचार्ज करताय तर कॅशबॅकचा फायदा तुम्हाला पुढील महिन्यांपासून मिळेल.
काय आहे हा प्लान
एअरटेलच्या ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा २८ दिवसांसाठी तसेच अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलची सुविधा आहे.