मुंबई : अनेकदा कॉल करताना आपल्याला नेटवर्क नसल्याने समस्यांना सामोरे जावे लागते. नेमकं गरजेच्या वेळी नेटवर्क समस्येमुळे आपले बोलणे होऊ शकत नाही. अजूनही ग्रामीण भागातील काही ठिकाणी पूर्णपणे नेटवर्क पोहोचलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना डोंगरावर जावे लागते. आता या सर्व समस्यांवर जिओ तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.
जिओ ही दूरसंचार कंपनी ग्राहकांसाठी नवीन सेवा आणण्याच्या तयारीत आहे. नेटवर्क नसल्याने येणाऱ्या समस्यांचा सामना ग्राहकांना करावा लागू नये, यासाठी ही सेवा सुरु करण्याचा विचार आहे. या वर्षाच्या जुलैमध्ये रिलायन्स जिओ देशभरात voWi-Fi सेवेची चाचणी करत असल्याचे वृत्त आले होते. आता ही सेवा लवकरच देशभरात सुरु करणार असल्याचे वृत्त आहे. 'टेल्को' या टेलिफोन कंपनीनुसार मध्य प्रदेशात यावर चाचणी झाली आहे. सूत्रांनुसार मध्य प्रदेशासोबतच आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळसह अन्य सर्कलमध्ये या सेवेची चाचणी घेण्यात आली आहे. औपचारिकरित्या या सेवेचं अनावरण केले गेले नाही. जानेवारी महिन्यात यावर औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. ही सेवा सुरु झाल्यानंतर विनानेटवर्क जिओच्या माध्यमातून कॉल करता येणार आहे.
सुरुवातीच्या काळात ही सेवा केवळ जिओच्या ग्राहकांसाठीच असणार आहे. यानंतर इतर नेटवर्कसाठी कॉलिंगची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. ही सुविधा स्मार्टफोनसोबत जिओ फोनवर देखील मिळणार असल्याचे याआधी सांगण्यात आले होते. जिओद्वारे दिलेल्या फिचर मोबाईल मध्ये 4 जी वोल्ट (VoLTE) ही सेवा देण्यात आली आहे. गेल्या तिमाहीत जिओने २० कोटी फिचर फोन विकण्याची माहिती सांगितली होती.
दूरसंचार विभागाच्या परवानगीनंतरच Wi-Fi वर व्हॉइस कॉलिंग सेवेला हिरवा कंदील मिळाला. या सेवेत ग्राहक कोणत्याही सेल्युलर नेटवर्कशिवाय Wi-Fi च्या साह्याने कॉल करु शकतात. रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना ही सेवा उपलब्ध करुन देण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर एअरटेल आणि व्होडाफोन या कंपनी देखील VoWi-Fi टेक्नोलॉजी आपल्या ग्राहकांना देण्यासाठी हालचाल करत आहे. इतर देशात व्होडाफोनकडून या सेवेची सुरुवात केली आहे. यामुळे भारतात या सेवेची सुरुवात करणे कठीण वाटते आहे.