पैसे असो वा नसो, NPCI ची भन्नाट सुविधा! UPI खातं क्रेडिट कार्डप्रमाणे वापरता येणार

NPCI ने RBI च्या मदतीने UPI वापरकर्त्यांसाठी एक नवीन सुविधा आणली आहे. या सुविधेअंतर्गत तुमचे UPI खाते क्रेडिट कार्डप्रमाणे काम करणार आहे. 

Updated: Jul 11, 2024, 07:48 PM IST
पैसे असो वा नसो, NPCI ची भन्नाट सुविधा! UPI खातं क्रेडिट कार्डप्रमाणे वापरता येणार title=

UPI Credit Card : आता तुमच्या जवळ पैसे असो वा नसो, तुम्ही तुम्हाला हव्या त्या गोष्टी बिनधास्तपणे खरेदी करू शकता. कारण आता NPCI ने RBI च्या मदतीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा आणली आहे. जर तुम्ही UPI वापरत असाल तर ही खास सुविधा तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरणार आहे.  UPI वापरकर्त्यांना पहिल्यांदाच अशा प्रकारची सुविधा मिळणार आहे. या सुविधेअंतर्गत तुम्ही तुमचे UPI क्रेडिट कार्ड म्हणून वापरू शकणार आहात. 

कोणाला मिळणार ही सुविधा

NPCI ने आणलेली ही सुविधा काही निवडक बँक ग्राहकांनाच मिळणार आहे. NPCI ने आणलेल्या या सुविधेमुळे, तुमचे UPI खाते अगदी क्रेडिट कार्डप्रमाणे काम करणार आहे.  संपूर्ण सिस्टीम Buy Now, Pay Later यावर आधारित असणार आहे. 

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकने बँकांना ही सुविधा देण्याची परवानगी दिली आहे. UPI च्या या नव्या सुविधेमुळे तुमच्या खात्यात पैसे नसले तरी देखील तुम्ही कोणत्याही ठिकाणी शॉपिंग आणि इतर कोणत्याही गोष्टीचे बिल करु शकणार आहात.

या बँकांचा आहे समावेश

NPCI ने आणलेली ही सुविधा ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन बँक आणि पीएनबीसह अनेक बँका ही सुविधा देणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना जवळ पैसे नसले तरी UPI द्वारे कोणत्याही प्रकारचे पेमेंट करता येणार आहे. 

UPI चे नवीन वैशिष्ट्य

या सुविधेअंतर्गत तुम्हाला बँकेकडून एका मर्यादेपर्यंत कर्ज दिलं जाणार आहे. जे तुम्हाला बँकेने दिलेल्या मुदतीत भरावे लागणार आहे. या अंतर्गत तुम्ही खर्च केलेल्या रकमेवरच व्याज देखील तुम्हाला द्यावे लागणार आहे. एकप्रकारे हे UPI चे नवीन वैशिष्ट्य आहे. ही सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. येत्या काही दिवसांत तुम्ही दुकानांतून वस्तू खरेदी करण्यासाठी या सुविधेचा वापर करू शकता. या सुविधेचा वापर करण्यासाठी, तुम्हाला कोणतीही नवीन प्रक्रिया फॉलो करण्याची गरज नाही.