'ही' पुणेकर तरुणी 4296 कोटींची मालकीण! सावित्रीबाई फुले विद्यापीठातून शिक्षण घेतलं अन्...

Pune Woman Built Rs 75000 Crore Empire: पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधून तिने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तिने अनेक बड्या कंपन्यांमधील नोकरी सोडून स्वत:ची कंपनी सुरु केली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 12, 2023, 09:30 AM IST
'ही' पुणेकर तरुणी 4296 कोटींची मालकीण! सावित्रीबाई फुले विद्यापीठातून शिक्षण घेतलं अन्... title=
सध्या ती अमेरिकेमध्ये वास्तव्यास आहे (फोटो- ट्वीटरवरुन साभार)

Pune Woman Built Rs 75000 Crore Empire: मराठी माणूस व्यवयासामध्ये मागे पडतो असं वाक्य तुम्ही यापूर्वीही ऐकलं असेल. मात्र पुण्यातील एका तरुणीने हे विधान खोडू काढता येईल अशी दमदार कामगिरी करत हजारो कोटींचं साम्राज्य उभं केलं आहे. या पुणेकर तरुणीचं नाव आहे नेहा नारखेडे. नेहाचा जन्म, शिक्षण आणि बालपण भारतामध्येच गेलं. 2006 साली ती अमेरिकेमध्ये गेली. तिथे जॉर्जिया टेक येथे तिने कंप्युटर सायन्समध्ये मास्टर्स डिग्री पूर्ण केली. तिला युनायटेड किंग्डममध्ये ओरॅकल, लिंक्डइनसारख्या आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली. मात्र या कंपन्यांमध्ये काही काळ नोकरी केल्यानंतर तिने तडकाफडकी राजीनामा दिला आणि तिथून तिचा खरा प्रवास सुरु झाला. सध्या नेहा ही अमेरिकेतील सर्वात यशस्वी महिला उद्योजकांपैकी एक आहे.

75 हजार कोटींची कंपनी उभारली

2014 साली नेहाने अमेरिकेमध्ये कॉनफ्लुएंट नावाची कंपनी सुरु केली. यावेळी तिच्याबरोबर केवळ 2 सहकारी होते. लिंक्डइनमध्ये काम करताना तिचे सहकारी असलेले दोघेजण या नव्या कंपनीमध्ये तिच्याबरोबर काम करु लागले. अल्पावधीमध्ये कॉनफ्लुएंटला यश मिळू लागलं. 2021 मध्ये ही कंपनी सार्वजनिक क्षेत्रात आली. या कंपनीचं सध्याचं मूल्य हे 9.1 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकं आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 75 हजार कोटी इतकी होते. या कंपनीमधील 6 टक्के वाटा हा नेहाच्या मालकीचा आहे.

2021 साली सुरु केली नवी कंपनी

नेहा केवळ कॉनफ्लुएंटच्या यशावर समाधानी राहिली नाही. नेहाने 2021 साली ऑनलाइन फसवणूक ओळखू शकणारी ओसीलर नावाची कंपनी सुरु केली. तिने या कंपनीमध्ये 160 कोटींची गुंतवणूक केली आहे. नेहा सध्या या कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. नेहाने तिचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून घेतलं आहे. लिंक्डइनमध्ये काम करताना तिने अॅपचे काफका नावाची मेसेजिंग सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी मोलाचं योगदान दिलं होतं. 

प्रेरणास्थान कोण?

नेहा तिच्या या यशस्वी वाटचालीचं श्रेय तिच्या वडिलांना देते. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नेहाने तिचे वडील तिच्यासाठी चांगली पुस्तकं निवडायचे. त्यांनी मला समाजिक बंधनं जुगारुन स्वत:च्या हक्कांसाठी लढणाऱ्या महिलांच्या यशोगाधा ऐकवल्या होत्या, असं नेहा सांगते. नेहाने आपण इंदिरा गांधींसंदर्भातील अनेक पुस्तकं वाचली आहेत, असं सांगितलं. इंद्रायणी नूरी आणि किरण बेदी यांच्या संघर्षाबद्दलही नेहाने वाचलं आहे. या सर्व गोष्टी वाचून, समजून महिला सबलिकरणाचं बाळकडू आपल्याला मिळाल्याचं नेहा सांगते.

एकूण संपत्ती 4296 कोटी

नेहा सध्या अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामधील पालो अल्टो येथे वास्तव्यास आहे. अमेरिकेतील सर्वात यशस्वी 100 महिला उद्योजिकांच्या 'फोर्ब्स'च्या यादीत नेहा 50 व्या स्थानी आहे. नेहाची एकूण संपत्ती 4296 कोटी इतकी आहे.