नवी दिल्ली : आपल्या ग्राहकांना सलग स्वस्त टेरिफ प्लान देत टेलिकॉम सेक्टरमध्ये जबरदस्त पकड निर्माण करणाऱ्या रिलायन्स जिओने पुन्हा एकदा एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. पाहूयात रिलायन्स जिओने आता कुठला रेकॉर्ड केला आहे.
जानेवारी महिन्याच्या टेलिकॉम डेटामध्ये रिलायन्स जिओने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. जिओने आपल्या प्रतिस्पर्धी एअरटेल कंपनीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी अधिक ग्राहक जोडले आहेत.
जानेवारी महिन्यात एअरटेलने १५ लाख ग्राहक जोडले तर, जिओने ८३ लाख नवे ग्राहक जोडले आहेत. आयडिया कंपनीने जानेवारीत ११.४ लाख ग्राहक जोडले तर वोडाफोनने १२.८ ग्राहक जोडले आहेत. तर, या दरम्यान रिलायन्स कम्युनिकेशनने २१.१ लाख ग्राहक गमावले आणि एअरसेलने ३४.९ लाख ग्राहक गमावले आहेत.
जानेवारी महिन्यात ८३ लाख नवे ग्राहक जोडल्यानंतर रिलायन्स जिओचा मार्केट शेअर वाढून १४.६२ टक्के झाला आहे. ट्रायने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार, जिओचा मार्केट शेअर डिसेंबरमध्ये १३.७१ टक्के होता. नोव्हेंबरमध्ये १३.०८ टक्के आणि ऑक्टोबर महिन्यात १२.३९ टक्के होता. सप्टेंबर २०१६ महिन्यात लॉन्चिंग नंतर जिओचा मार्केट बेस सलग वाढत असल्याचं पहायला मिळत आहे.
रिलायन्स जिओने ग्राहकांना स्वस्त आणि मस्त प्लान दिल्यानंतर इतरही टेलिकॉम कंपन्यांना स्वस्त प्लान्स देण्यास भाग पाडलं आहे. इतर कंपन्यांनी डेटा प्लानच्या किमतीत कपात केल्यामुळे याचा थेट फायदा ग्राहकांना होत आहे.
रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वी JioFi 4G LTE हॉटस्पॉट डिवाईस लॉन्च केलं आहे. ९९९ रुपयांत लॉन्च करण्यात आलेल्या या नव्या डिवाईसला JioFi JMR815 नाव दिलं आहे. हे डिवाईस फ्लिपकार्टवरुन खरेदी करु शकता. कंपनी या सोबतच एका वर्षाची वॉरंटी देत आहे. याचा डाऊनलोड स्पीड 150Mbps आणि अपलोड स्पीड 50 Mbps आहे.