डीटीएच पोर्टेबिलिटी : सेट टॉप बॉक्सशिवाय बदलता येणार ऑपरेटर

सध्या सर्व्हिस प्रोव्हायडर एका सेट टॉप बॉक्ससाठी ग्राहकांकडून १७०० ते २००० रुपयांपर्यंत वसूल करतात

Updated: Mar 27, 2019, 04:33 PM IST
डीटीएच पोर्टेबिलिटी : सेट टॉप बॉक्सशिवाय बदलता येणार ऑपरेटर  title=

मुंबई : तुम्ही तुमच्या डीटीएच ऑपरेटर अथवा केबल प्रोव्हायडरच्या सर्व्हिसवर संतुष्ट नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे... लवकरच मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) प्रमाणेच डीटीएच सर्व्हिस प्रोव्हायडरही तुम्हाला बदलता येणार आहे. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी तुम्हाला केवळ एका मॅसेजमधून मोबाईक क्रमांक न बदलाताही केवळ दुसरा ऑपरेटर निवडण्याची सुविधा मिळते. त्याचप्रमाणे आता तुम्हाला 'पोर्टेबिलिटी'मुळे तुम्हाला तुमचा सेट टॉप बॉक्स न बदलता केवळ ऑपरेटर बदलण्याची सुविधा मिळणार आहे.

'ट्राय'च्या अध्यक्षांनी दिली माहिती

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणचे (ट्राय) अध्यक्ष आर एस शर्मा यांनी याबद्दल माहिती दिलीय. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही सर्व कंपन्यांचे सेट टॉप बॉक्स इतरही डीटीएच किंवा केबल सर्व्हिस प्रोव्हयडरसाठी काम करू शकतील, असे बनवण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

या वर्षाच्या शेवटपर्यंत ही योजना अंमलात येऊ शकते. कोणत्याही प्रोडक्टमध्ये इंटर ऑपरेबिलिटीचा विचार प्रोडक्टची प्लानिंग करतानाच व्हायला पाहिजे, असा आग्रहही शर्मा यांनी केलाय. 

डीटीएच सर्व्हिस पोर्टेबिलिटी सुविधा मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी प्रमाणेच काम करेल. ज्यापद्धतीनं तुम्ही टेलिकॉम कंपन्यांकडे अर्ज करता त्याचप्रमाणे 'डीटीएच'च्या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडेही तुम्ही अर्ज करू शकाल. ट्राय दीर्घकाळापासून यावर काम करत आहे. 

सध्या सर्व्हिस प्रोव्हायडर एका सेट टॉप बॉक्ससाठी ग्राहकांकडून १७०० ते २००० रुपयांपर्यंत वसूल करतात. हा पैसा नॉन रिफंडेबल असतो. त्यामुळे योग्य सुविधा मिळत नसली तरी क्वचितच ग्राहक आपला सर्व्हिस प्रोव्हायडर बदलण्याबाबत विचार करतात अन्यथा त्यांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता असते. 

डीटीएच पोर्टेबिलिटीनंतर ग्राहकांना केवळ एक कार्ड बदलण्याची गरज पडेल. त्यांचा जुन्हा सेट टॉप बॉक्स काम करू शकेल. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त पैसे देण्याची आवश्यकता उरणार नाही.