Zepto Notification To Women Issue: अगदी कमी वेळात घरपोच ऑनलाइन किराणा माल घरपोच पोहचवणाऱ्या झेपटो अॅप्लिकेशन सध्या एका नोटीफिकेशनमुळे वादात सापडलं आहे. झेपटो अॅप्लिकेशनला आपल्या अधिकृत हॅण्डलवरुन या नोटीफिकेशसाठी माफी मागावी लागली आहे. सोशल मीडियावर या नोटीफिकेशनचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आणि त्यामधूनच आता थेट या कंपनीला माफी मागावी लागली आहे.
सध्या क्विक कॉमर्स अॅप्लिकेशन्स म्हणजेच अगदी कमी वेळात किराणामाल आणि हव्या त्या गोष्टी घरी आणून देणाऱ्या कंपन्यांची जोरदार चलती आहे. यामध्ये झेपटो, ब्लिंकइट, स्वीगी इन्स्टामार्ट यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. हे अॅप्लिकेशन नियमितपणे त्यांच्या ग्राहकांना नोटीफिकेशन पाठवत असतात. हे नोटीफिकेशन अनेकदा फारच विचित्र आणि असंवेदनशील असतात. असाच एक मेसेज झेपटो कंपनीने बंगळुरुमधील महिला ग्राहक पल्लवी पारेख यांना पाठवला. याच नोटीफिकेशनवरुन कंपनी वादात सापडली.
'पल्लवी, I-Pill तुला मिस करत आहे,' असं नोटीफिकेशन पाठवण्यात आलं होतं. यासोबत रडणारा इमोजीही पाठवण्यात आला होता. मात्र हे नोटीफिकेशन पल्ल्वी पारेख यांना फारसं रुचलं नाही. त्यांनी या नोटीफिकेशनचा स्क्रीनशॉट आपल्या लिंक्डइन अकाऊंटवरुन शेअर केला. यामध्ये त्यांनी, "मी कधीत तुमच्याकडून (झेपटोवरुन) आय-पील मागवली नाही. मागवली असली तरी ही काही अशी गोष्ट नाही जी माझ्या लक्षात राहायला हवी," अशी कॅप्शन देत नाराजी व्यक्त केली आहे. पल्लवी यांनी झेपटो आणि झेपटोच्या कस्टमर केअरला टॅग करत, "मी या इमर्जन्सी पिल्स घ्याव्यात अशी तुमची इच्छा आहे का? मी तुमच्याकडून कधी हे ऑर्डर केलेलं नसतानाही असं नोटीफिकेशन?" सवाल विचारला आहे.
नक्की वाचा >> टॉयलेट वापरायचंय? लघवीला जायचंय आधी फॉर्म भरा... Mumbai Metro चा अजब नियम
पल्लवी या कार्यालयीन ठिकाणी लैंगिक छळ रोखण्यासंदर्भातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी हा असा मजकूर चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. "तुमचा मेसेज मजेदार असण्याबरोबरच संवेदनशील असेल तरच त्याला अर्थ आहे. मात्र हा मेसेज फार फ्लर्ट करणारा आणि फालतू होता. हे फारच अयोग्य आहे," असं पल्लवी यांनी म्हटलं आहे.
पोस्ट व्हायरल झाल्यानंतर झेपटोने माफी मागितली आहे. लिंक्डइनवर पोस्ट करत झेपटोने, "पल्लवी, आम्ही चूक केली आणि त्यासाठी आम्ही माफी मागतो. आमचा संदेश चुकीचा होता आणि त्याने तुम्हाला त्रास झाल्याची आम्हाला कल्पना आहे," असं म्हटलं आहे.
दरम्यान, पल्लवी यांनी झेपटोच्या सेवेचं कौतुक केलं. त्यांनी दैनंदिन आयुष्यात झेपटो फार उपयोगी ठरतं असं म्हटलं आहे. मात्र त्यामुळे असे मेसेज खपवून घेता येणार नाही, असंही पल्लवी यांनी आवर्जून म्हटलं आहे.