मुंबई : सॅमसंग, व्हिवो आणि अॅपल सारख्या दिग्गद कंपन्या नवे स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. यातच आता भारतामध्ये जगातला सगळ्यात छोटा मोबाईल फोन लॉन्च झाला आहे. मोबाईल बनवणाऱ्या इलारी कंपनीनं हा फोन लॉन्च केला आहे. हा फोन 'नॅनो फोन सी' (NanoPhone C)चं अपग्रेड व्हर्जन असल्याचं बोललं जातंय. 'नॅनो फोन सी' चं जुनं व्हर्जन याच वर्षी जुलैमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. त्यावेळी या फोनची किंमत ३,९४० रुपये एवढी होती.
'नॅनो फोन सी' चं अपग्रेड व्हर्जन Yerha.com या वेबसाईटवरून विकत घेता येणार आहे. या फोनची किंमत २,९९९ रुपये एवढी असून प्लॅटिनम सिल्व्हर, रोज गोल्ड आणि ब्लॅक या रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. या फोनचं आधीचं व्हर्जन अॅल्यूमिनियम बॉडी आणि सिलिकॉन कीपॅडसोबत लॉन्च करण्यात आलं होतं.
जगातल्या सगळ्यात छोट्या फोनचं मॉडेल आणि फंक्शन जुन्या फोनशी मिळतं-जुळतं आहे. या फोनला ब्लूटूथ सपोर्टही देण्यात आला आहे. सगळ्यात छोट्या फोनचं वजनही सगळ्यात कमी आहे. या फोनचं वजन फक्त ३० ग्रॅम आहे. या नॅनो फोनमध्ये ब्लूटूथ, कॉल रेकॉर्डर, कॅलक्युलेटर, 32GB पर्यंत मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट, मायक्रो सीम सपोर्ट, MP3 प्लेअर, एफएम रेडियो हे फिचर्स आहेत.
जगातल्या सगळ्यात छोट्या मोबाईलला एक इंचाची TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये मीडिया टेक MT6261D प्रोसेसर असून 32MB रॅम आहे. याचबरोबर फोनमध्ये 32MB इंटरनल मेमरीही देण्यात आली आहे. या फोनची बॅटरी 280mAh एवढी आहे. या फोनवर लागोपाठ ४ तास बोलता येऊ शकतं तर बॅटरीला ४ दिवस स्टँडबाय टाईम आहे, असा दावा कंपनीनं केला आहे.