मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊन काळात अनेक लोक कॅश पेमेंटवरून ऑनलाइन पेमेंटकडे वळले आहेत. गुगल पे आणि फोन फोसोबतच आता बँकिंग अॅपचा देखील वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय काही लोक कार्ड पेमेंट करणं पसंत करतात. कार्ड पेमेंटसाठी मात्र थोडी कटकट होते. त्यामध्ये 13 ते 16 अंकी नंबर टाकावा लागतो आणि त्यासोबत सीव्हीसी देखील द्यावा लागतो. या सगळ्या कटकटीपासून आता सुटका होणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक आता डिजिटल पेमेंटमध्ये मोठे बदल करणार आहे. डेटा सिक्युअर करण्यासाठी या बदलाचा फायदा थेट ग्राहकांना होणार आहे. ऑनलाइन फसवणूक वाचवण्यासाठी टोकनाइजेशन लागू करण्याबाबत रिझर्व्ह बँक तयारीमध्ये आहे. जानेवारी 2022 पासून ही सिस्टीम लागू करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.
तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट वरूनही खरेदी केली असेल आणि त्यानंतर पेमेंट करताना कार्ड नंबर न टाकता जर तुम्ही फक्त सीव्हीसी नंबर टाकायला सांगत असेल तर ते धोकादायक आहे. कारण याचा अर्थ ई-कॉमर्स वेबसाइटवर तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डबद्दल आधीच संपूर्ण माहिती आहे. पण आता ते होणार नाही. ई-कॉमर्स वेबसाइट तुमच्या कार्डाची माहिती साठवू शकत नाहीत. त्याऐवजी, पेमेंट 'टोकन सिस्टीम' द्वारे केलं जाणार आहे.
सोप्या भाषेत सांगायचं तर आता तुमच्या कार्डचा नंबर तुम्ही ई कॉमर्स वेबसाईटला न देताही पेमेंट करू शकणार आहात. टोकनाइजेशनमध्ये तुम्हाला तुमचे कार्ड तपशील एंटर करण्याची गरज नाही. त्याऐवजी 'टोकन' नावाचा एक अनोखा पर्यायी क्रमांक आहे. जो तुमच्या कार्डाशी जोडलेला असेल. ज्याचा वापर करून तुमच्या कार्ड तपशील तुम्ही सुरक्षित ठेवू शकता आणि पेमेंट करू शकता. याचा अर्थ जेव्हा तुम्ही अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइटवर खरेदी केल्यानंतर पेमेंट करता, तेव्हा तुम्हाला तुमचा 16 अंकी कार्ड क्रमांक टाकावा लागणार नाही, त्याऐवजी तुम्हाला टोकन क्रमांक टाकावा लागेल.
ई कॉमर्स वेबसाईला कार्ड पेमेंट कंपन्यांशी याचा करार करावा लागणार आहे. त्यामुळे हे नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील. 1 जानेवारीपासून कोणतीही ई कॉमर्स साईट तुमच्या कार्डचा डेटा ठेवू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही अधिक सुरक्षित पेमेंट टोकन सिस्टीम द्वारे करू शकता.