नोटबंदीचे साइडइफेक्ट! पेट्रोलपंपावर तुफान गर्दी; शेतकऱ्यांनी नोटा नाकारल्या आणि...

रिझर्व्ह बँकेनं 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. त्यावरुन आता राजकीय वारप्रहार सुरु झालेत. नोटबंदीचा निर्णय धरसोडपणाचा असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलीय तर मोदींनी अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा केला असा घणाघात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी केली.

वनिता कांबळे | Updated: May 20, 2023, 07:29 PM IST
नोटबंदीचे साइडइफेक्ट! पेट्रोलपंपावर तुफान गर्दी; शेतकऱ्यांनी नोटा नाकारल्या आणि... title=

RBI on 2000 Note: 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं तसा निर्णय जाहीर केला आहे. 30 सप्टेंबरपर्यंतच या गुलाबी नोटा चलनात असणार आहेत. 23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदली करता येतील. एकावेळी जास्तीत जास्त 20 हजार रुपयांच्या नोटा बदली करता येणार आहेत. आता या नोटबंदीचे साइडइफेक्ट पहायला मिळत आहेत.  पेट्रोलपंपावर तुफान गर्दी; शेतकऱ्यांनी नोटा नाकारल्या आहेत तर, देशात दोन हजारांची नोटबंदी झाल्यानंतर शिर्डीतलं साई संस्थान अलर्ट झाल आहे. 

पेट्रोलपंपावर 2 हजारांच्या नोटा घेऊन नागरिकांनी गर्दी

2 हजारच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याची घोषणा आरबीआयनं केली, त्यानंतर पेट्रोलपंपावर 2 हजारांच्या नोटा घेऊन नागरिकांनी गर्दी केली. ठाण्यात माजिवडा पेट्रोलपंपावर इंधन भरुन लोकं दोन हजारांच्या नोटा दिसत आहेत. बँकांमध्ये जाऊन बदली करण्यापेक्षा काही खरेदी करुन 2 हजारांच्या नोटा देण्यावर नागरिकांचा भर आहे. दुसरीकडे सगळेच दोन हजार रुपयांच्या नोटा घेऊन आल्यामुळे सुट्टे पैसे परत देण्यासाठी पेट्रोलपंप चालकांची मात्र तारांबळ उडताना दिसत आहे. 

शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून नोटा नाकारल्या

30 सप्टेंबर नंतर 2000 च्या नोटा चलनात नसणारे. याची धास्ती आता व्यवसायिक आणि ग्राहकांनी घेतली आहे. याचा परिणाम नाशिकमध्ये देखील पाहायला मिळतोय. नाशिकच्या शरदचंद्र पवार मार्केटयार्ड मध्ये कांद्याचे मोठे मार्केट आहे. या मार्केट मध्ये अनेक शेतकरी हे आपला कांदा घेऊन येतात. मात्र, दोन हजार रुपयाची नोट बंद असल्याची धास्ती त्यांनी घेतली आहे. ज्यावेळी व्यापारी हे कांद्याच्या मोबदल्यात पैसे देत असताना त्यात दोन हजाराची नोट दिली तर शेतकरी हे दोन हजार रुपयाची नोट घेत असल्याचं व्यापाऱ्यानी सांगितले. 

दानपेटीत दोन हजारांच्या नोटा टाकू नयेत; साईभक्तांना अवाहन

देशात दोन हजारांची नोटबंदी झाल्यानंतर शिर्डीतलं साई संस्थान अलर्ट झालंय.. 30 सप्टेंबरनंतर साईभक्तांनी दानपेटीत दोन हजारांच्या नोटा टाकू नयेत असं आवाहन शिर्डी साई संस्थानने केले आहे. मागच्या नोटबंदीवेळी भक्तांनी कोट्यवधींच्या नोटा दानपेटीत टाकल्या होत्या. तेव्हा यावेळी मात्र साई संस्थाननं आधीच भक्तांना आवाहन केले आहे. 
केंद्र सरकारने 2 हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत नोटा जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचं शिर्डीतल्या व्यावसायिकांनी स्वागत केले. 2000 ची नोट बंद केल्यानं कुठलंही नुकसान होणार नसल्याचं शिर्डीतील व्यवसायिकांनी सांगितले.