गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : भारत-चीन सीमेवर (India China Border) वाशीमच्या (Washim) जवानाला वीरमरण आले आहे (soldier Martyrs ). अमोल गोरे असे या जवानाचे नाव आहे. पुढच्या आठवड्यात हा जवान गावी येणार होता. मात्र, त्याआधीच पंचक्रोशीत त्याच्या निधनाची दुख:द बातमी पसरली आहे.
अमोल गोरे हा वाशीम जिल्ह्यातील सोनखास येथील राहणारा आहे. भारतीय सैन्य दलात पॅराशूट कमांडो म्हणून तो कार्यरत होता. भारत-चीन सीमेवरील अरुणाचल प्रदेश येथे ठिकाणी युनिट 11 SF पॅरा सैनिक पेट्रोलिंग मध्ये कर्तव्य बजावत असताना सोबतचे दोन जवान सकाळी चार वाजता पहाडीवरुन घसरल्यामुळे बर्फात दबले होते.
या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान त्या दोन जवानांना वाचवण्यासाठी अमोलने सकाळी चार वाजता बर्फामध्ये उडी घेतली. मात्र, त्यात त्या दोघांना वाचवण्यात यश आलं मात्र वाशिम जिल्ह्याचे सुपुत्र अमोल गोरे हा सैनिक शहीद झाला.
वाशिम जिल्ह्यातील सोनखास या त्यांच्या मुळगावी रात्री पार्थिव आणलं जाणार असून उद्या 19 एप्रिल रोजी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शहीद जवान अमोल गोरे हे देशसेवेसाठी सैन्यदलात दाखल झाले होते. पॅरा कमांडो म्हणून कार्यरत होते. याआधी झालेल्या अनेक महत्वपूर्ण अभियानात त्यांनी सहभाग घेऊन देशसेवा केली होती.
24 एप्रिलला ते सुट्टी घेऊन गावी येणार होते. मात्र त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली आहे. अमोल यांना अवघा चार वर्षाचा चिमुकला मुलगा आहे.
त्यांच्या पाश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. अमोल सारख्या धाडसी आणि मनमिळावू जवानाच्या शाहिद होण्याने वाशीम जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.