नागपूर: दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा विधानसभेत भुजबळांच्या आक्रमकतेची झलक पाहायला मिळाली. भुजबळांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना लक्ष्य केले. वनखात्याच्या वृक्षलागवडीच्या योजनेवर त्यांनी उपहासात्मक टीका केली. तर वनविभाग आदिवासींना जमिनीचे पट्टे देत नसल्याचा आरोप भुजबळांनी केला. त्यामुळे भडकलेल्या मुनगंटीवारांनी थेट जेल आणि रुग्णालयातील बेडचा उल्लेख करत भुजबळांना टोला लगावला.
महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळ्याच्या आरोपाखाली भुजबळ सुमारे दोन वर्षे दोन महिने कारागृहात होते. नागपूरात दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांची चारचाकी वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भुजबळ यांनी शुक्रवारी पावसामुळे विधिमंडळाचे कामकाज वाया गेल्याचा मुद्दा उपस्थित केला. विधान भवनाच्या वीजघरात पावसाचे पाणी साचल्याने दोन्ही सभागृह दिवसभरासाठी तहकूब करावे लागले होते. या मुद्यांवरून त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेवरही त्यांनी टिप्पणी केली. जलयुक्त शिवार ही योजना ग्रामीण भागात राबवण्यात येत असल्याची कल्पना होती, परंतु आता तर ती विधिमंडळाच्या परिसरात राबवण्यात येत आहे. यासाठी अध्यक्षांची परवानगी घेण्यात आली होती काय, असा खोचक सवाल भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.