पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस; गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडले

या धरणाच्या खाली असलेल्या वैनगंगा नदीच्या पात्रात हे पाणी सोडण्यात आल्यामुळे  गडचिरोली जिल्ह्यातील नद्या तुडूंब भरून वाहत आहेत. 

Updated: Jul 9, 2018, 06:36 PM IST
पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस; गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडले title=
नागपूर: पूर्व विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढला आहे. परिणामी या धरणाचे ३३ पैकी ९ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले.  सकाळी पहिल्या पाच दरवाजातून ५१८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता त्यानंतर धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे धरण विभागाने दुपारी ९ दरवाजे अर्धा-अर्धा मीटरने उघडले आहे. त्यातून ९३७ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण विभागाकडून आता २४२ मीटरवर जलस्तर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या धरणाच्या खाली असलेल्या वैनगंगा नदीच्या पात्रात हे पाणी सोडण्यात आल्यामुळे  गडचिरोली जिल्ह्यातील नद्या तुडूंब भरून वाहत आहेत. 
 
रायगडमध्येही धरणांतील पाण्याची पातळी वाढली
गेल्या चार दिवसांतल्या पावसात अवघा रायगड जिल्हा भिजून गेलाय. पावसानं कृपा केल्याने धरणे वेगाने भरायला सुरुवात झालेय. जिल्ह्यातली आणि जिल्ह्यालगतची छोटी मोठी २६ धरणं भरुन वाहू लागलीयत. त्यामुळे अनेक नद्याही दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. या सगळ्यामुळे कोकणात शेतीच्या कामांना वेग आला आहे.