राज्याचे गृहमंत्री म्हणतात, अपशब्द काढणाऱ्यावर देशद्रोहाचाच गुन्हा दाखल व्हायला हवा

गुन्हा दाखल तेथे कालीचरण महाराजांना ताब्यात घेणार

Updated: Dec 30, 2021, 06:15 PM IST
राज्याचे गृहमंत्री म्हणतात, अपशब्द काढणाऱ्यावर देशद्रोहाचाच गुन्हा दाखल व्हायला हवा title=

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी ( mahatma gandhi ) यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्यावर देशद्रोहाचाच गुन्हा दाखल व्हायला हवा असे स्पष्ट मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( dilip valse patil ) यांनी आज नागपूर येथे व्यक्त केलं. 

शिवस्तोत्रासाठी (Shivstotra) ओळखले जाणारे कालीचरण महाराज ( kalicharan maharaj ) यांनी रायपूरच्या धर्मसंसदेत महात्मा गांधींविरोधात अपशब्द वापरले होते. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचेही त्यांनी कौतुक केले.

त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्र विधिमंडळात उमटले होते. मंत्री नवाब मलीक यांनी बनावट बाबाने हे विधान कुठेही केले असेल. पण तो अकोल्याचा रहिवासी आहे. सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला अनेक आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांच्यावर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने दिलं होतं.

कालीचरण महाराज यांच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. यावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागपूर येथे पत्रकाशी बोलताना कालीचरण महाराजांचा ताबा महाराष्ट्र पोलिस नक्कीच घेईल. राष्ट्रपित्यांच्या संदर्भात असे शब्द वापरणे, त्यांचा अपमान करणे खूप मोठा गुन्हा आहे. खरं पाहिलं तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्रात जिथे जिथे गुन्हा दाखल आहे. त्या त्या ठिकाणी पोलिस त्यांना ताब्यात घेईल असं त्यांनी म्हटलं आहे.