पुणे: पुणे शहरात रविवारी विसर्जन मिरवणुकांमध्ये गणेश मंडळांनी न्यायालयाने दिलेला डीजे आणि डॉल्बी बंदीचा आदेश अक्षरश: धाब्यावर बसवला. बाजीराव आणि टिळक रस्त्यावरून जाणाऱ्या बहुतांश गणेश मंडळांनी न्यायालयाची बंदी झुगारून लावली. त्यामुळे याठिकाणी कानठळ्या बसवणारा डीजेचा दणदणाट ऐकायला मिळाला. सुरुवातीला पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र, काहीवेळानंतर टिळक रस्त्यावरून जाणाऱ्या गणेश मंडळांना पोलिसांनी डीजे लावण्यापासून मज्जाव केला. त्यावेळी पोलीस व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
तत्पूर्वी आज सकाळी पुण्यातील मानाच्या गणपतींची मिरवणूक पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघाली. मात्र, संध्याकाळी विसर्जनासाठी जाणाऱ्या बहुतांश गणेश मंडळांनी डीजेची बंदी अक्षरश: झुगारून लावली. न्यायालयाने घातलेल्या या बंदीविरोधात गणेश मंडळांनी शनिवारपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. डीजे नाही तर गणपतीचे विसर्जन करणार नाही, असा इशारा मंडळांनी दिला होता. सरकार आणि पोलिसांनी यावर कोणतीही भूमिका घेतली नव्हती. अखेर आज बहुतांश मंडळांनी डीजेबंदीच्या आदेशाची पायमल्लमी केली. त्यामुळे आता पोलीस या मंडळांवर काय कारवाई करणात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.