'जर तुमच्यात हिंमत असेल, तर...,' राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ टाळल्यानंतर PM नरेंद्र मोदींचं जाहीर आव्हान

LokSabha Election: पश्चिम बंगालमधील (West Bengal) प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला. हिंमत असेल तर अमेठीत (Amethi) भाजपाचा सामना करा असं जाहीर आव्हानच त्यांनी दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 3, 2024, 12:56 PM IST
'जर तुमच्यात हिंमत असेल, तर...,' राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ टाळल्यानंतर PM नरेंद्र मोदींचं जाहीर आव्हान title=

LokSabha Election: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली आहे. पश्चिम बंगालमधील (West Bengal) प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जाहीर आव्हान देत हिंमत असेल तर अमेठीत (Amethi) भाजपाचा सामना करा असं म्हटलं आहे. तसंच पराभवाच्या भीतीपोटीच केरळमधील वायनाडमधून माघार घेतल्याचा दावा केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपल्या जुन्या विधानाचा दाखला दिला, ज्यामध्ये त्यांनी राहुल गांधी वायनाडमधील मतदानानंतर आपल्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधत असल्याचं म्हटलं होतं. “मी आधीच सांगितलं होतं की शहजादाचा वायनाडमध्ये पराभव होणार आहे. मी म्हणालो होतो, की वायनाडमध्ये मतदान पूर्ण होताच ते दुसरी जागा शोधू लागतील. ते अमेठीला इतके घाबरले आहेत की रायबरेलीकडे धावत आहेत. ते प्रत्येकाला घाबरु नका असं सांगत आहेत. आज मी त्यांनाहीसांगतो की, घाबरू नका, पळू नका".

'पाकिस्तान रडत आहे, त्यांना काँग्रेसच्या शेहजादाला....',PM नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप, राहुल गांधींना केलं लक्ष्य

 

नरेंद्र मोदी यांनी यावेळी सोनिया गांधी यांनी रायबरेली मतदारसंघ सोडल्याने आणि राज्यसभेची निवड केल्याने त्यांच्यावरही निशाणा साधला. "मी संसेदत आधीच म्हटलं होतं की, त्यांचा मोठा नेता निवडणूक लढण्याची हिंमत दाखवणार नाही आणि पळून जातील. त्या राजस्थानला पळून गेल्या आणि आता राज्यसभेत परतल्या आहेत," असं नरेंद्र मोदी म्हणाले.

काँग्रेसने गेल्या अनेक दिवसांपासू सुरु असलेला सस्पेन्स अखेर संपवला असून, रायबरेलीमधून राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा केली आहे. दुसरीकडे अमेठीत गांधी कुटुंबाचे विश्वासू किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

राहुल गांधी यांनी 2004 मध्ये अमेठी या गांधी कुटुंबाच्या बालेकिल्ल्यातून निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला होता. 2004, 2009 आणि 2014 मध्ये त्यांनी ही निवडणूक जिंकली होती. 2019 मध्ये, स्मृती इराणी यांनी या मतदासंघातून राहुल गांधींचा पराभव केला होता. 

राहुल गांधी यांचे वडील दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हे 1981 ते 1991 मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत अमेठीचे खासदार होते. सोनिया गांधी यांनी 1999 मध्ये लोकसभेतही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

दरम्यान गुरुवारी नरेंद्र मोदींनी पाकिस्तानमधील नेते चौधरी फवाद हुसेन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींचं कौतुक केल्यानंतर जोरदार हल्लाबोल केला होता. पाकिस्तानी नेत्यांना काँग्रेसच्या शेहजादाला भारताचं पंतप्रधान करायचं आहे असा दावा त्यांनी केला. गुजरातच्या आनंद येथे आयोजित प्रचारसभेत नरेंद्र मोदी बोलत होते. ते म्हणाले की, "काँग्रेस येथे मरणाला टेकली असताना पाकिस्तान रडत आहे. पाकिस्ताने नेत्यांना काँग्रेसच्या शेहजादाला भारताचं पंतप्रधान करायचं आहे". काँग्रेस पाकिस्तानचा चाहता असाही आरोप त्यांनी केला आहे.