मोदींकडे वास्तव सांगण्याची ताकद नाही- शरद पवार

पंतप्रधानांवर सतत वाटाघाटीचे आरोप होत आहेत.

Updated: Dec 9, 2018, 08:05 PM IST
मोदींकडे वास्तव सांगण्याची ताकद नाही- शरद पवार title=

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वास्तव सांगण्याची ताकद नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. ते रविवारी पुण्यात राष्ट्रवादीकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी यांनी साडेचार वर्षात एकदातरी पत्रकार परिषद घेऊन आपल्या निर्णयांची माहिती जनतेला दिली का? गेल्या काही काळापासून राफेल व्यवहारातील वाटाघाटींवरून पंतप्रधानांवर सतत आरोप होत आहेत. मात्र, एकदाही मोदी किंवा संरक्षणमंत्र्यांनी पुढे येऊन त्याविषयी स्पष्टीकरण दिले नाही, अशी टीका पवार यांनी केली. 
 
 याशिवाय, आगामी निवडणुकीत भाजपविरोधात महाआघाडी अपरिहार्य आहे. सध्या देशातील वातावरण चिंताजनक आहे. या सगळ्यातून देशाची सुटका करायची असेल तर समविचारी पक्षांना एकत्र यावे लागेल. यासाठी सोमवारी दिल्लीत भाजप वगळता देशातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक होणार आहे. यावेळी प्रत्येक राज्यात शक्य त्याठिकाणी भाजपविरोधी एकत्र येण्याचा प्रस्ताव मांडला जाईल, असे पवार यांनी सांगितले.