प्रताप नाईक, कोल्हापूर :- सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.जिल्ह्यातील 60 हुन अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.यामुळे प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला सतत सुरू असलेल्या पाऊसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचा घटना वाढल्या आहेत. सध्या पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू असून पंचगंगेची पाणी पातळी 37 फूट 3 इंच इतकी आहे.
विशाळगडावरील ऐतिहासिक बुरुज कोसळला
शाहूवाडी तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विशाळगडाच्या पूर्वेकडील बाजूचा दगडी बुरुज गुरुवारी सकाळी कोसळला आहे. सुदैवाने गडावरील मलिक रेहानबाबा मलिक उरुसाची बुधवारी सांगता झाल्याने तसेच अतिवृष्टीमुळे गडप्रेमी नागरिकांची वर्दळ थांबल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. गडावर जाण्यायेण्यासाठी उभारलेल्या लोखंडी जिन्याच्या बाजूचा बुरुज कोसळून दगड, खरमातीचा ढीग या लोखंडी जिन्यावर येऊन पडला आहे. यामुळे हा लोखंडी जिन्याचा मार्गाची वाहतुक बंद करण्यात आला आहे.
गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 107 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.. दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 77.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
तालुकावार पाऊस
गगनबावडा 77.7 मिमी पाऊस, हातकणंगले- 14.6 मिमी, शिरोळ -8.8 मिमी, पन्हाळा- 43.4 मिमी, शाहूवाडी- 48.4 मिमी, राधानगरी- 51.1 मिमी, गगनबावडा-77.7 मिमी, करवीर- 30.2 मिमी, कागल- 26.3 मिमी, गडहिंग्लज- 18.9 मिमी, भुदरगड- 48.3 मिमी, आजरा-39 मिमी, चंदगड- 72.7 मिमी
सांभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने पोलीस विभाग सज्ज आहे. पावसाच्या पाण्याने ओढे, नाले ओसंडून रस्त्यावरुन पाणी वाहत असल्यास वाहनधारकांनी अशावेळी पाण्यात वाहने घालू नयेत. रस्त्यावर पाणी आले असल्यास एसटी, बसेस देखील पाण्यात घालू नयेत अस आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केला आहे. आपत्तीच्या काळात गरज भासल्यास पोलीस प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाच्या 112 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देखील बलकवडे यांनी केले आहे.