पुणे : निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. भाषण करत असताना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी निवडणूक सर्व्हेचा उल्लेख केला. नेमका तोच आधार घेत, सर्व्हे फिरवे काही नसते. पवार साहेबांची पावसात सभा झाली आणि सगळे सर्व्हे वाहून गेले, असे पवार म्हणताच एकच हंशा पिकला. पुष्पगुच्छ देणाऱ्या कार्यकर्त्यांनाही निवडणुकीत कुठे होता, असा मिश्किल सवाल अजित पवार यांनी करताच चांगलीच खसखस पिकली.
दरम्यान, अजित पवार यांनी खाते वाटपाबाबत स्पष्ट केले. सध्या जे खाते वाटप झालं आहे ते काही काळापुरते आहे. या महिनाअखेरपर्यंत मंत्रीमंडळाचे स्वरुप स्पष्ट होईल. पुण्याचा पालकमंत्रीही लवकरच घोषित होईल. त्यानंतर काय करायचे ते पाहू. सगळ्यांना सोबत घेऊन काम करु, असे कार्यकर्त्यांना सांगितले.
सध्या मुख्यमंत्र्यांशिवाय सहा मंत्री राज्याचा कारभार पाहत आहेत. नागपूरला होणाऱ्या आगामी हिवाळी अधिवेशनात काही प्रश्न निर्माण झाल्यास हे सहाही जण ते सांभाळून घेऊ शकतात. कारण हे सर्वजण अनुभवी मंत्री आहेत. सुभाष देसाई, एकनाथ शिंदे हे मागच्या सरकारच्या काळात मंत्री होते. छगन भुजबळ, जयंत पाटील, नितीन राऊत, बाळासाहेब थोरात हे देखील आघाडी सरकारच्या काळात मंत्री होते. यातील काही जणांनी दहा आणि पंधरा वर्षे मंत्रीपदावर काम केलेले आहे. त्यामुळे काहीही अडचण येणार नाही, असे अजित पवार म्हणालेत.