माझे अजित पवारांशी अनेक मतभेद असतील पण शरद पवारांसोबत असतानाही.. : राज ठाकरे

Raj Thakcery Pune Rally Speech On Ajit Pawar: राज ठाकरेंनी मुलरीधर मोहोळ यांच्यासाठी घेतलेल्या जाहीर प्रचारसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही उल्लेख केला.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 11, 2024, 08:51 AM IST
माझे अजित पवारांशी अनेक मतभेद असतील पण शरद पवारांसोबत असतानाही.. : राज ठाकरे title=
राज ठाकरेंनी पवारांवर साधला निशाणा

Raj Thakcery Pune Rally Speech On Ajit Pawar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीचे पुणे मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी शुक्रवारी पुण्यात सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी सहकार्याचं राजकारण पुण्याच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत भाषणामध्ये व्यक्त केलं. हे मत व्यक्त करत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मात्र त्याचवेळी अजित पवार यांचं कौतुकही केलं.

प्रगतीचं राजकारण करायचं नाही असे अनेक नेते..

"पुण्यात असंख्य विद्यापीठं, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला महाविद्यालयं, अभिमत विद्यापीठं, आयटीपार्क, कॉर्पोरेट क्षेत्र प्रचंड आहे. आपलं पुणे दिल्लीला म्हणजे केंद्र सरकारला 80 हजार कोटी रुपये कर स्वरूपात देतं. इतकी अफाट शक्ती आहे पुण्याची मग अशा शहराच्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी जास्त असते. इथे महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार असा ताळमेळ अतिशय महत्त्वाचा आहे," असं राज ठाकरे म्हणाले. याच मुद्द्याला धरुन पुढे राज ठाकरेंनी, "ज्यांना असं सहयोगाचं, प्रगतीचं राजकारण करायचं नाही असे अनेक नेते इथे जातीपातीचं राजकारण करत आहेत," असा टोला लगावला.

अजित पवारांचं कौतुक

"एखादा माणूस स्वतःची कमजोरी लपविण्यासाठी जातीचा आधार घेतो आणि समाजात विष पसरवतो. त्यांना आपण बळी पडता कामा नये," असं राज ठाकरे थेट कोणाचंही नाव न घेता म्हणाले. "लहानपणापासून येतोय मी पुण्यात. एक छान टुमदार पुणं होतं. आज त्या शहराची काय दुरावस्था झाली आहे. नियोजनशून्यता ही शहराच्या मुळावर उठली आहे," असं नमदू करतानाच पुढे राज ठाकरेंनी अजित पवारांचं कौतुक केलं. "माझे अजित पवारांसमवेत अनेक मतभेद असतील पण एक गोष्ट निश्चित सांगतो कि, शरद पवारांसोबत असतानाही अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केलं नाही," असं राज ठाकरे म्हणाले.

नक्की वाचा >> '70 लाख लोकसंख्या असलेल्या पुण्यात..'; राज ठाकरेंनी समस्यांचा पाढाच वाचला

जेम्स लेन प्रकरणाचा उल्लेख

"राम गणेश गडकरींचा पुतळा उखाडला गेला. अनेकांना वाटलं असेल नितीन गडकरींचे नातेवाईक आहेत. त्या उखडणाऱ्याला माहीतही नसेल कोण होते ते," असा टोला राज ठाकरेंनी लगावला. "जेम्स लेन प्रकरण आणलं गेलं. त्या जेम्स लेनने कुणाचंही नाव घेतलं नाही, त्याने स्वतः 2022 साली स्पष्टीकरण दिलं. पण तोपर्यंत समाजात किती विष कालवलं गेलं. कारण जातीपातीचे राजकारण करायचं होतं," असं राज म्हणाले.

नक्की वाचा >> 'मोदींच्या काळात ‘हिंदू खतरे में’ असेल तर..', ठाकरेंचा टोला! म्हणाले, 'आगलाव्या पक्षांनी..'

पुणेकरांना सुखाने या शहरात...

"पुण्यामध्ये अनेक अभ्यासक, तज्ञ, विद्वान ह्या शहरात राहतात. या शहराची मांडणी, ह्या शहराचं नोयोजन कसं व्हावं? पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था कसं असलं पाहिजे? पुणेकरांना सुखाने या शहरात श्वास घेता आला पाहिजे. हे काम आपल्या महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि इथले लोकप्रतिनिधी यांच्यावर आहे. माझाही त्यात सहभाग असणारच आहे याची ग्वाही देतो," असं म्हणत राज यांनी भाषण संपवलं.