पुणे: पत्नीने आत्महत्या केल्याचा पतीचा बनाव; सत्य समोर आल्यावर सर्वांनाच बसला धक्का

Pune Crime News: या दोघांच्या लग्नाला 12 वर्ष झाली असून त्यांना एक 11 वर्षांचा मुलगा देखील आहे. या दोघांमध्ये मागील काही काळापासून अनेकदा भांडणं व्हायची. महिलेचे वडील एकदा घरी गेले असता ती बेशुद्धावस्थेत आढळून आली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 27, 2024, 09:51 AM IST
पुणे: पत्नीने आत्महत्या केल्याचा पतीचा बनाव; सत्य समोर आल्यावर सर्वांनाच बसला धक्का title=
पत्नीची हत्या करुन पती फरार (प्रातिनिधिक फोटो)

Pune Crime News: पुण्यामध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव करुन पतीनेच तिची हत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सदर प्रकार हा पुण्यातील गोखलेनगरमध्ये घडला आहे. पत्नीचा खून करुन पसार झालेल्या या तरुणाविरोधात चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील जोडप्याचा विवाह 12 वर्षांपूर्वी झाला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गोलगेनगरमधील जनवाडी येथील जनता वसाहतीत राहणाऱ्या रेश्मा चंदर पंतेकर या 30 वर्षीय महिलेचा तिच्या पतीने म्हणजेच चंदरने खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाषणामधील सुतारवाडीत राहणाऱ्या 24 वर्षीय राहुल मंजाळकरने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. रेश्मा आणि चंदर यांचं 12 वर्षांपूर्वी लग्न झालं आहे. या दोघांना एक 11 वर्षांचा मुलगाही आहे. मागील काही महिन्यांपासून सातत्याने या दोघांमध्ये वाद होत होते. काही महिन्यांपासून चंदर पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता.

चंदर तिच्याकडे अनेकदा पैशांची मागणी करत होता. त्यामुळे रेश्मा माहेरी गेलेली. 19 जानेवारी रोजी चंदरने रेश्माशी संपर्क साधला. माझी चूक झाली आहे. तू घरी ये, असे त्याने पत्नीला सांगितले. त्यानंतर रेश्मा घरी आली. बुधवारी म्हणजेच 24 जानेवारी रोजी राहुलने चंदरशी संपर्क साधला. तेव्हा रेश्मा कामावर गेल्याचे त्याने सांगितले. संशय आल्याने रेश्माचे वडील तिच्या घरी आले. तेव्हा रेश्मा बेशुद्धावस्थेत सापडली . पंख्याला ओढणी बांधण्यात आल्याचे रेश्माच्या वडिलांना आढळून आले. रेश्माला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच रेश्माचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालात रेश्माचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. चंदरनेच रेश्माचा खून केल्याचा संशय असून या घटनेमुळे रेश्माच्या घरच्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. चंदर बेपत्ता असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चंदर पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये नेमका किती लोकांचा सहभाग होता, चंदरला इतर कोणी मदत केली का याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.