अमेरिकेत गेल्या 24 तासात 1500 कोरोना रुग्णांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

Updated: May 20, 2020, 02:52 PM IST
अमेरिकेत गेल्या 24 तासात 1500 कोरोना रुग्णांचा मृत्यू title=

वॉशिंग्टन : बुधवारी पुन्हा एकदा अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची मोठी संख्या दिसून आली. गेल्या चोवीस तासात जवळपास 1500 लोकांनी प्राण गमावले आहेत. जी गेल्या काही दिवसांतली सर्वात मोठी संख्या आहे. गेल्या एका आठवड्यापासून अमेरिकेत एक हजाराहूनही कमी मृत्यूची नोंद होत होती, पण आता पुन्हा एकदा मृतांची संख्या वाढू लागली आहे.

अमेरिकेत एकूण मृत्यूंचा आकडा 91 हजारांच्या पुढे गेला आहे, जो एक लाखाकडे वेगाने वाढताना दिसत आहे. आतापर्यंत अमेरिकेतील 15 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दररोज येथे २० हजाराहून अधिक नवीन रुग्ण वाढत आहेत.

अमेरिकन संशोधनानुसार, जूनच्या सुरुवातीच्या आठवड्यांपर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे मृतांची संख्या दीड लाखांच्या पुढे जाईल आणि जुलैच्या सुरूवातीस दोन लाखांवर पोहोचू शकते.

एकीकडे अमेरिकेत मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे, दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत देशातील लॉकडाऊन हळूहळू काढण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. ट्रम्प यांच्या या निर्णयावरही सतत टीका केली जात आहे. पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेत इतके रुग्ण का आहेत असं विचारला असता त्यांनी त्यावर उत्तर दिलं की, आम्ही सर्वात जास्त चाचण्या केल्या आहेत.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जेथे चाचण्या अधिक असतील तेथे आणखी प्रकरणे असतील. आज अमेरिका चाचणीच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांची टेस्ट करण्यात आली आहे. अमेरिका चाचणी करण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे, तर भारत याबाबतीत सातव्या क्रमांकावर आहे.