अमेरिकेचं 'WHO'ला धमकीचं पत्र, पण उत्तर दिलं चीनने

कोरोना व्हायरसवरुन अमेरिका, चीन आणि जागतिक आरोग्य संघटन यांच्यात रोजच शाब्दिक चकमकी होत आहेत.

Updated: May 20, 2020, 01:35 PM IST
अमेरिकेचं 'WHO'ला धमकीचं पत्र, पण उत्तर दिलं चीनने title=

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसवरुन अमेरिका, चीन आणि जागतिक आरोग्य संघटन यांच्यात रोजच शाब्दिक चकमकी होत आहेत. आता तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO च्या प्रमुखांना पत्र लिहून थेट धमकीच दिली आहे. ट्रम्प यांच्या या पत्राला WHO ऐवजी चीननेच उत्तर दिलं आहे. ट्रम्प यांचं हे पत्र संकेत, किंतू-परंतू यांनीच भरलेलं आहे. अमेरिका नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी याप्रकारचे हातखंडे वापरत असल्याचा आरोपही चीनने केला आहे.

अमेरिका आपली जबाबदारी झटकण्यासाठी WHO वर निशाणा साधून चीनला मुद्दा करत आहे, पण अमेरिकेने चुकीचं लक्ष्य निवडलं आहे, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले. 

कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत ९० हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे, तर १४ लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेने या परिस्थितीसाठी चीन आणि WHO ला जबाबदार धरलं आहे. एवढच नाही तर अमेरिकेने WHOला देण्यात येणारा निधीही थांबवण्याची धमकी दिली आहे. याच मुद्द्यावरून ट्रम्प यांनी WHO प्रमुखांना पत्र लिहिलं. या पत्रात ट्रम्प यांनी चीनवरही निशाणा साधला. 

ट्रम्प सरकार चीनच्या ऍण्टी-व्हायरस बनवणाच्या प्रयत्नांमध्ये खोडा घालण्याचं काम करत आहे. कोरोनाचा सामना करताना आलेलं अपयश लपवण्यासाठी अमेरिका दुसऱ्यांना दोष देत आहे, अशी टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.

काय आहे ट्रम्प यांच्या पत्रात?

डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO चे प्रमुख टेड्रोस एडहोम यांना पत्र लिहिलं आहे. जर ३० दिवसात WHOची कार्यप्रणाली सुधारली नाही, तर अमेरिका WHOला देणारा निधी कायमचा बंद करेल. कोरोनाला रोखण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या संघटनेने वारंवार चुकीची पावलं उचलली आहेत. याचा परिणाम जगाला भोगावा लागत आहे. WHOला पुढे जायचं असेल, तर चीनपासून आपली स्वतंत्रता सिद्ध करण्याचा एकमेव पर्याय त्यांच्यापुढे आहे, असं ट्रम्प या पत्रात म्हणाले आहेत.