40 लाख लोकसंख्या, 6 कोरोना रुग्ण, तरीही संपूर्ण शहरात चीनने लावला लॉकडाऊन

फक्त ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर ही संपू्र्ण शहरात का केलं गेलं लॉकडाऊन

Updated: Oct 26, 2021, 02:56 PM IST
40 लाख लोकसंख्या, 6 कोरोना रुग्ण, तरीही संपूर्ण शहरात चीनने लावला लॉकडाऊन

मुंबई : चीनने 40 लाख लोकसंख्या असलेल्या लांझोऊ शहरात कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लोकांना अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, सरकारी पथकांनीही शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी सुरू केली आहे. बाधित आढळलेल्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. या आठवड्यात, संक्रमणाचा वेग कमी करण्यासाठी चीनने राजधानी बीजिंगमधील हॉटेल्सच्या बुकिंगवर बंदी घातलीये.

गेल्या 24 तासात केवळ 6 रुग्ण आढळले

भारतासह अनेक देशांच्या तुलनेत चीनमध्ये कोरोना संसर्गाचा वेग खूपच कमी आहे. असे असतानाही खबरदारी म्हणून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची केवळ 29 प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये लांझोऊमध्ये आढळून आलेल्या रुग्णांची संख्या 6 होती. असे असतानाही चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

शहरातील प्रवाशांवर सरकारची नजर

चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, लांझोऊ शहरातून बाहेर पडणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यात येत आहे. सर्व लोकांना त्यांच्या घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य अधिकार्‍यांचा असा विश्वास आहे की जसजसे आम्ही चाचणी वाढवत आहोत, तसतसा संसर्गाचा वेग देखील वाढू शकतो.

राजधानी बीजिंगमध्ये हॉटेल बुकिंगवर बंदी

एकेकाळी शून्य संसर्ग शहर असलेल्या बीजिंगमध्ये कोरोनाची एकूण प्रकरणे आता 9 झाली आहेत. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने पुन्हा लोकांची कोविड तपासणी सुरू केली आहे. इतकेच नाही तर लोकांना फ्लाइट आणि हॉटेल्स बुक करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशननुसार, देशाच्या विविध भागांमध्ये कोविड-19 च्या स्थानिक प्रसाराची 38 प्रकरणे समोर आली आहेत.

लसीकरणानंतर लोक बेफिकीर ?

कोरोनाचा संसर्ग पहिल्यांदा चीनमध्ये दिसून आला. त्यानंतर या देशात मोठा लॉकडाऊन झाला. नंतर, जेव्हा लोकांना लसीचे डोस दिले जाऊ लागले, तेव्हा निर्बंधही हटवले गेले. 2021 च्या सुरुवातीपासून चीनमधील लोक मोठ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र येताना दिसले. चिनी नववर्ष, राष्ट्रीय दिन अशा प्रसंगी मोठ्या संख्येने लोक एकत्र आले. लोकांनी मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे ही सोडले होते.

चीनची लस कमी प्रभावी?

चीनमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता चीनच्या लसीच्या परिणामाबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. केवळ चीनमध्येच नाही, तर ज्या देशात ही लस लागू करण्यात आली आहे, तेथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. मंगोलिया, बहारीन, सेशेल्स, चिली आणि तुर्कीसह अनेक देशांनी चीनची लस वापरली, ज्याचा फटका त्यांना लगेचच सहन करावा लागला.

चिनी लस नवीन प्रकारावर प्रभावी नाही

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चिनी लस प्रभावी ठरत नसल्याचे अनेक देशांच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. विशेषत: कोरोनाच्या नवीन प्रकारावर या लसीचा प्रभाव अजिबात दिसत नाही. तज्ज्ञांनी म्हटले आहे की, कोणत्याही देशातील कोरोनाची प्रकरणे हे त्या देशाच्या नागरिकांना कोणत्या कंपनीची लस देत आहेत यावर अवलंबून असते.