पॅरीस : जगभरातील तज्ज्ञ डॉक्टर जीवघेण्या 'एडस' या रोगावर उपचार शोधत आहेत. या सर्वांसाठी ही खुशखबरच आहे. स्टेमसेल प्रत्यारोपण तंत्रानं ब्रिटनमध्ये एका रुग्णाला एचआयव्हीमुक्त करण्यात यश आलंय. जगातील अशा प्रकारचं हे दुसरं उदाहरण आहे. उपचार करण्यात आलेल्या पुरुष रुग्णावर स्टेमसेल प्रत्यारोपणानंतर एचआयव्हीची कुठलीही लक्षणं दिसली नाहीत. गेले १८ महिने या रुग्णामध्ये एचआयव्ही आणि कर्करोगाची कुठलीही लक्षणं दिसली नसून त्या रुग्णाला औषधांचीही गरज भासलेली नाही. त्यामुळेच स्टेमसेल प्रत्यारोपण उपचारांवर खात्रीशीर उपाय म्हणून शिक्कामोर्तब झालंय.
'नेचर' या पत्रिकेमध्ये या संशोधनाविषयी माहिती देण्यात आलीय. संशोधनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, एचआयव्ही संक्रमित व्यक्तीची रोगातून सुटका होण्याची घटना १० वर्षांपूर्वी समोर आली होती. आता लंडनमध्ये स्टेमसेल्स प्रत्यारोपनानंतर तब्बल १९ महिने उटलून गेले तरीदेखील रुग्णामद्ये एचआयव्ही आणि कर्करोगाच्या विषाणूचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.
एचआयव्ही संक्रमित हे दोन्ही रुग्ण रक्ताच्या कर्करोगानं पीडित होते. त्यांच्यावर स्टेमसेल्स प्रत्यारोपणाच्या माध्यमातून उपचार करण्यात आले.
परंतु, स्टेमसेल्स प्रत्यारोपण ही एक धोकादायक आणि त्रासदायक प्रक्रिया असल्याचं केंब्रिज विद्यापीठाचे प्रोफेसर रवींद्र गुप्ता आणि त्यांच्या टीमनं स्पष्ट केलंय. हा एचआयव्हीपासून मुक्ती मिळवण्याचा व्यावहारिक पर्याय नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. परंतु, स्टेमसेल्सच्या माध्यमातून एडस् विषाणुंपासून सुटका मिळवता येऊ शकते, हे संशोधन समोर आल्यानंतर वैज्ञानिकांना आणखीन उपचाराच्या पद्धती शोधण्यासाठी त्याची मदत होऊ शकते.
भारतीय संशोधकासह वैज्ञानिकांनी असा दावा केलाय. अशाच पद्धतीनं एचआयव्ही आणि कर्करोगमुक्त करण्यात आलेला हा दुसरा रुग्ण आहे. लंडनमधील हा रुग्ण असून त्याच्यावर हा प्रयोग झालाय.
दहा वर्षांपूर्वी बर्लिनमधील टिमोथी ब्राऊन नावाच्या व्यक्तीवर पहिल्यांदा हे उपचार करण्यात आले होते आणि त्याला रक्ताचा कर्करोग आणि एचआयव्ही एड्समधून मुक्तता मिळाली होती. उल्लेखनीय म्हणजे, एचआयव्हीमुळे प्रत्येक वर्षी जवळपास १० लाख लोकांचा मृत्यू होतो. जगभरात ३७ दशलक्ष एचआयव्ही एड्सग्रस्त रुग्ण आहे. १९८० पासून ३५ दशलक्ष लोकांचा जगभरात मृत्यू झालाय.