Viral Letter: सोशल मीडियावर एका व्यक्तीने आपल्या आईने कॅन्सरमुळे मृत्यू होण्यापूर्वी लिहिलेलं शेवटचं पत्र शेअर केलं आहे. या पत्रात महिलेने आपला मुलगा मॅटने उपचारादरम्यान आपली काळजी घेण्यासाठी दिलेल्या त्यागाचा उल्लेख करत आभार मानले आहेत. "तुला हे पत्र एक दिवस मिळेल या आशेने मी हे लिहित आहे. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला माहिती आहे अशी आशा आहे," असं महिलेने पत्रात लिहिलं आहे. हे पत्र वाचल्यानंतर नेटकरी भावूक झाले आहेत.
"माझ्या आईचा कॅन्सरमुळे मृत्यू झाल्यानंतर तिने लिहिलेलं पत्र मला सापडलं आहे," असं मॅटने Reddit वरील पोस्टमध्ये लिहिलं आहे. "मला रोज तिची आठवण येते. यामुळे मला रडू येते. पण मी चेहऱ्यावर हसू ठेवून रडतो. सध्या वेळ कठीण आहे. माझे वडील सध्या कॅन्सरमुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे रुग्णालयात आहेत. तुम्ही ज्या लोकांवर प्रेम करता त्यांना ते किती महत्ताचे आहेत हे सांगा. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता याची त्यांना आठवण करुन द्या," असंही कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
महिलेने पत्रात लिहिलं आहे की, "मला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तू हजर होतास. उपचारादरम्यान तू हातात काही पैसा नसेल हे माहिती असतानाही नोकरी सोडलीस. यासाठी मी तुझी आभारी आहे".
"मी नेहमी तुला पाहत असेन. मला मृत्यूपेक्षाही तुला सोडून जाण्याची जास्त भीती होती. तू सर्वोत्तम मुलगा आहेस," अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत. यावेळी महिलेने मुलासोबत घालवलेल्या सर्वोत्तम क्षणांचाही उल्लेख केला आहे. मॅटने Reddit वर काही दिवसांपूर्वी पत्र शेअर केलं असून, ते व्हायरल झालं आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
एका युजरने लिहिलं आहे की, "मी इतकंच सांगू शकतो की तू किती चांगली व्यक्ती आहेस ज्याने आईला तिच्या गरजेच्या वेळी इतकं दिलं. "किती सुंदर स्त्री आणि आई. तिचे पत्र सापडले हे किती भाग्यवान आहे. मला तुझ्या या नुकसानाबद्दल खेद वाटतो पण जोपर्यंत तुझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम आहे तोपर्यंत ती नेहमीच तुझ्यासोबत असेल. आई आणि मुलाचे नातं कधीच संपत नाही," असं दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे.
एका युजरने लिहिलं आहे की, "मी पाहिलेली ही सर्वोत्तम गोष्ट आहे. तिच्याकडे तुझ्यासारखा मुलगा आणि तुझ्याकडे तिच्यासारखी आई होती याचा आनंद आहे".