Accenture Lay Off: अॅसेंचर कंपनीने गुरुवारी आपल्या वर्षिक आर्थिक उत्पन्न आणि नफ्याचा अंदाज व्यक्त करताना तो अपेक्षेपेक्षा कमी असेल असं म्हटलं आहे. तसेच अॅसेंचर (Accenture) कंपनीने एकूण कर्मचारी संख्येच्या 2.5 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचं जाहीर केलं आहे. म्हणजेच एकूण 19000 कर्मचाऱ्यांना कंपनी नारळ देणार (Accenture to Cut Off 19000 employees) आहे. जागतिक स्तरावरील आर्थिक गणितं बिघडत असल्याचे संकेत देणारी मागील काही काळामधील ही चौथी घटना आहे. यापूर्वीच फेसबुकची मातृक कंपनी असलेल्या मेटाबरोबरच गुगल, अॅमेझॉनने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार करण्यात येणाऱ्या कर्मचारीकपातीपैकी अर्ध्याहून अधिक कपात ही नॉन-बिलेबल कॉर्परेट कर्मचाऱ्यांची असेल. म्हणजेच थेट क्लायंटशी संबंध न येणाऱ्या विभागांमधून कर्मचाऱ्यांची छाटणी करण्यास कंपनीचं प्राधान्य असेल. कंपनीला आता आर्थिक वर्षामधील कमाई (Accenture trims forecasts) ही 8 ते 10 टक्क्यांदरम्यान असेल असं वाटत आहे. यापूर्वी हाच आकडा कंपनीने 8 ते 11 टक्क्यांदरम्यान राहील अशी शक्यता व्यक्त केली होती. मागील महिन्यामध्ये अॅसेंचर कंपनीची स्पर्धक कंपनी असलेल्या कग्निझंट टेक्नोलॉजी सोल्यूशन्सने आपली ग्रोथ बुकींग म्युट केली होती. म्हणजेच इतर कंपन्यांबरोबर सुरु असलेल्या सेवांसंदर्भातील निर्णय स्थगित केले होते. 2022 मधील पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीला अपेक्षित नफा झाला नव्हता.
अॅसेंचरने आता प्रत्येक शेअरमागील कमाई ही 10.84 डॉलर ते 11.06 डॉलरदरम्यान राहील असं म्हटलं आहे. पूर्वी ही कमाई 11.20 ते 11.52 डॉलर्सपर्यंत राहील अशी कंपनीला अपेक्षा होती. "कॉम्प्रेस्ड ट्रान्सफॉर्मेशन्सवर सध्या कंपन्या लक्ष केंद्रीत करत असून जास्तीत जास्त प्रमाणात ते अंमलात आणण्याचा सर्व कंपन्यांचा प्रयत्न आहे," असं अॅसेंचरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या ज्युली स्वीट यांनी म्हटलं आहे. भविष्यात कंपनी आर्थिक संकटांची चर्चा असताना कशी वाटचाल करणार याबद्दल बोलताना स्वीट यांनी हे विधान केलं.
अॅसेंचर कंपनी ही जगभरातील 120 हून अधिक देशांमध्ये सेवा पुरवते. या कंपनीमध्ये 7 लाखांच्या आसपास कर्मचारी काम करतात. मार्च 2022 च्या आकडेवारीनुसार अॅसेंचर कंपनीमध्ये 3 लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. 2022 साली लिंक्डइनने जारी केलेल्या अहवालानुसार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनंतर अॅसेंचर आणि कग्निझंट कंपन्या या आयटी कंपन्यांच्या यादीतील भारतीयांमधील सर्वाधिक लोकप्रिय कंपन्या आहेत. मात्र आता कर्मचारीकपातीमध्ये कोणत्या देशातील किती लोकांना काढणार, ही प्रोसेस कशी असणार यासंदर्भात कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र या बातमीमुळे पुन्हा एकदा आर्थिक मंदीमुळे थेट भारतीय आयटी सेक्टरला फटका बसणार याकडे इशारा करत आहे.