घटस्फोट घेताच ही महिला होणार मुकेश अंबानींपेक्षाही जास्त श्रीमंत?

...तर मॅकेन्झी बेजोस या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीपेक्षाही अधिक संपत्तीच्या मालकीण ठरतील

Updated: Jan 11, 2019, 11:35 AM IST
घटस्फोट घेताच ही महिला होणार मुकेश अंबानींपेक्षाही जास्त श्रीमंत?

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अमेझॉनचे संस्थापक - मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस (Jeff Bezos) आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेत आहेत. बेजोस यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली होती. जेफ आणि मॅकेन्झी यांच्या लग्नाला आता २५ वर्ष उलटली आहेत. उल्लेखनीय म्हणजे ५५ वर्षीय जेफ बेजोस आणि त्यांची ४८ वर्षीय पत्नी मॅकेन्झी बेजोस यांचा हा घटस्फोट जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरू शकतो. कारण घटस्फोटानंतर संपत्तीची विभागणी झाली तर मॅकेन्झी या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीपेक्षाही अधिक संपत्तीच्या मालकीण ठरणार आहेत. सोबतच त्या जगातील सर्वात श्रीमंत महिलाही ठरतील.

वॉशिंग्टनच्या कायद्यानुसार, वैवाहिक आयुष्यात मिळवलेल्या संपत्तीची घटस्फोटानंतर पती-पत्नीत समभागात विभागणी केली जाते. 'ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स'नुसार, बेजोस १३७ अरब डॉलर अर्थात ९.५९ लाख करोड रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. कायद्यानुसार पती-पत्नीमध्ये संपत्तीची समान विभागणी झाली तर मॅकेन्झी यांना ४.७६ लाख करोड रुपयांची संपत्ती मिळू शकेल.

मॅकेन्झी यांना ४.७६ लाख करोडोंची संपत्ती मिळाली तर त्या सध्याच्या 'जगातील सर्वात श्रीमंत महिला' असलेल्या एलाइस वॉल्टन यांनाही संपत्तीच्या बाबतीत मागे टाकतील. वॉलमार्टच्या उत्तराधिकारी वॉल्टन यांची संपत्ती ३.२२ लाख करोड रुपये आहे.

जेफ बेजोस यांनी १९९४ साली अमेझॉनची स्थापना केली होती. जेफ आणि मॅकेन्झी यांची बेट डीई शॉ मध्ये झाली होती. मॅकेन्झी या 'प्रिन्सटन युनिव्हर्सिटी'त नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी गेल्या असताना त्यांची भेट जेफ यांच्याशी झाली होती. त्यांची ही भेट अमेझॉनच्या स्थापनेपूर्वी झाली होती. मॅकेन्झी बेजोस अमेझॉनच्या पहिल्या कर्मचारी होत्या. विवाहाच्या वेळी या दोघांमध्ये एखादा करार झाला होता का? याबद्दल अद्याप खुलासा झालेला नाही. या जोडप्याला चार मुलं आहेत. 

परंतु मिळालेल्या माहितीनुसार, मॅकेन्झी बेजोस यांनी घटस्फोटानंतर पतीच्या संपत्तीतून हिस्सा न मागण्याचं ठरवलंय. मॅकेन्झी या लेखिका आहेत. त्यांनी 'द टेस्टिंग ऑफ ल्युथर अलब्राईट' आणि 'ट्रॅप्स' अशा अनेक कादंबऱ्यांचं लेखन केलंय. त्यांचे शालेय शिक्षण सॅन फ्रान्सिस्कोमध्ये झालंय.